आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्रामध्ये सध्या विरोधकासाठी विरोध सुरू असून, हे आंदोलन जे विरोधकांनी अवलंबवले आहे. त्यामुळे विरोधी पक्षाचाच भविष्यात सत्यानाश होणार आहे, असे प्रत्युत्तर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपला दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काल झालेली सभा ही ऐतिहासिक होती. जे टीका करत आहेत, त्यांच्या डोळ्यातील बुबळं बाहेर आली असतील. कालची सभा अती विराट सभा होती, त्यामुळे त्यांच्या टीकेला लक्ष देण्याची गरज नाही, असे म्हणत संजय राऊतांनी विरोधकांना टोला लगावला. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
टीका करण्यासारखे काय?
औरंगाबादमध्ये बुधवारी शिवसेना पक्षप्रमुख तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा झाली. त्यावर राऊतांनी भाष्य केले. ते म्हणाले की, "मुख्यमंत्र्यांनी सभेमध्ये सर्वच प्रश्नाचा समाचार घेतला. खासकरून औरंगाबादच्या पाणी प्रश्नावर, विकासाच्या मुद्यावर उद्धव ठाकरे यांनी ठाम भूमिका घेतली. काश्मिरी पंडितांवर भाष्य केले. त्यामुळे आता यावर टीका करण्यासारखे काय आहे", असा सवाल राऊतांनी केला.
असे असेल तर हे चुकीचे
राऊत पुढे म्हणाले की, "गुरुवारची सभा ही मराठवाड्यातील जनतेसाठी होती, देशातील प्रश्न काय आहे आणि शिवसेनेची त्यात काय भूमिका आहे, यासाठी होती, काश्मिरी पंडितांचा सुरू असलेला आक्रोश त्यासाठी त्यांना समर्थन देण्यासाठी ही सभा होती. कोणाला जर याचे दुख: होत असेल तर हे चुकीचे आहे."
मुंडे, महाजनांचे नाव संपवण्याचा प्रयत्न
विधान परिषदेच्या उमेदवारीपासून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना डावलण्यात आले यावर देखील राऊतांनी भाष्य केले ते म्हणाले की, "कोणाला उमेदवारी देण्याची हा भारतीय जनता पक्षाचा अंतर्गत विषय आहे. मुंडे आणि महाजन यांचा शिवसेना-भाजप 25 वर्षांच्या युतीच्या काळामध्ये आमचा आणि त्यांचा निकटचा संबंध होता. या दोन नेत्यांमुळे महाराष्ट्रातल्या युतीला कायम बळ मिळत गेले. गोपीनाथ मुंडे हे लोकनेते होते. त्यांच्या कुंटुबातील बातमी वाचल्यानंतर आम्ही व्यथित होतो. पंकजा मुंडे या आपल्या वडिलांप्रमाणे बहुजन समाजाच्या, ओबीसीच्या नेत्या आहेत. त्यांना उमेदवारी नाकारल्यानंतर ज्या प्रकारचे पडसाद उमटले ते पाहिल्यावर आणि वाचल्यावर मला असे वाटले की, कोणीतरी पडद्यामागून मुंडे,महाजन यांचे नाव राज्यातून तसेत देशाच्या राजकारणातून संपावे यासाठी प्रयत्न करत आहे," असा आरोपही त्यांनी केला.
भाजपला गोंधळ निर्माण करायचा
भाजपकडून विधान परिषदेच्या सहाव्या जागेसाठी सदाभाऊ खोत यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. त्यावर राऊत म्हणाले की, "त्यांनी सहावी जागा लढू द्या की, सातवी जागा लढू द्या. त्यांना महाराष्ट्रामध्ये गोंधळ निर्माण करायचा आहे, पैशांचा खेळ करायचा आहे. आमच्या महाविकास आघाडीच्या कोट्यातील जागा आम्ही सर्वच्या सर्व जिंकू", असा विश्वास राऊतांनी यावेळी व्यक्त केला.
फडणवीसांचा कोरोना वाढलाय
देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी इंधनवाढीवरून राज्य सरकारवर टीकास्त्र केले होते. त्यावर बोलताना राऊत म्हणाले की, "त्यांना कोरोना झाला होता, आता त्यांचा कोरोना जास्तीच वाढताना दिसतोय. त्यांनी कालचे मुख्यमंत्र्यांचे भाषण काळजीपूर्वक ऐकले असेल तर त्यांना समजले असेल की, मुख्यमंत्र्यांनी अनेक प्रश्नावर केंद्रासमोर प्रश्न निर्माण केले आहे. काश्मिरी पंडितांच्या हत्याबाबत भाजपकडे, फडणवीसांकडे उत्तर आहे का, असा सवाल राऊतांनी विचारला आहे.
याला भाजप जबाबदार
"भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी केलेल्या वक्तव्यामुळे देशाला धमक्या दिल्या जात आहे, त्याला भाजप जबाबदार आहे. भाजपमुळे देशात दहशतवाद वाढत आहे. देशात सर्व व्यवस्थित सुरू असताना भाजपचे प्रवक्ता देशातील वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत. दोन धर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, याला भाजप जबाबदार आहे."
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.