आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाकरेंच्या भेटीनंतर सुनील राऊत दिल्लीत:म्हणाले, संजय राऊतांच्या जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार नाही

मुंबई/ नवी दिल्ली22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यापूर्वी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. संजय राऊत यांच्या जामिनासाठी आपण सुप्रीम कोर्टात दाद मागणार नसल्याचेही सुनील राऊत यांनी सांगितले.

पत्राचाळ घोटाळाप्रकरणी संजय राऊत सध्या न्यायालयीन कोठडी असून, जामिनासाठी त्यांचे कसोशीने प्रयत्न सुरू केले आहेत. सुनील राऊत म्हणाले की, संजय राऊत यांच्या जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याची वेळ येणार नाही. मुंबई सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला असून, त्यांनतर काय होते ते बघू, संजय राऊत यांच्यावर जे आरोप करण्यात आले त्याच काडीमोडीचाही संबंध नाही. फक्त संजय राऊत यांना अटक करून शिवसेनेचा आवाज बंद करायचा, याच कारणामुळे त्यांना अटक करण्यात आली आहे.

राऊत अ‌ॅक्शन मोडवर

गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत पत्राचाळ प्रकरणी आर्थररोड जेलमध्ये आहेत. त्यांना अजूनही न्यायालयाने जामीन मंजूर केलेला नाही. या पार्श्वभूमीवर आज आमदार सुनील राऊत दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. यावरून आता राजकीय चर्चेंना उधाण आले आहे. गेल्या एक महिन्यापासून ईडीकडून संजय राऊत यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान त्यांना अजूनही जामीन मंजूर झाला नसल्याने त्यांच्या जामिनासाठी भाऊ सुनील राऊत आता अ‌ॅक्शन मोडवर आले असल्याचे बोलले जात आहे.

ठाकरेंची घेतली भेट

दरम्यान, दिल्लीला जाण्यापूर्वी सुनील राऊत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यानंतर ते आज दिल्लीला रवाना झाले. त्यांच्या या दौऱ्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. त्यावर बोलताना सुनील राऊत म्हणाले की, "खासदार संजय राऊत यांचे घर दिल्लीमध्ये आहे, त्याबाबतची परिस्थिती पाहण्यासाठी मी दिल्लीत आलो आहे. मी कुणाचीही राजकीय भेट घेतलेली नाही, कुठल्याही वकिलांशी मी चर्चा केलेली नाही. मी मातोश्रीवर गेलो होतो. उद्धव ठाकरे हे माझे कुटुंब प्रमुख आहेत, त्यांना मी कायम भेटत असतो. संजय राऊत यांच्या जामिनाबाबत आम्ही सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार नाही. देशातला कुठलाही नामवंत वकील सांगेल की, संजय राऊत यांच्यावरच्या आरोपामध्ये काही तथ्य नाही, अशी प्रतिक्रिया आमदार सुनील राऊत यांनी दिली.

सध्या न्यायालयीन कोठडीत

पत्राचाळ घोटाळाप्रकरणी संजय राऊत यांना ईडीने 31 जुलैला अटक केली होती. त्यांनतर त्यांना विशेष न्यायालयाने आठ दिवसांची ईडी कोठडी सुनावली होती. नंतर मात्र, त्यांच्या पुन्हा 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. कोठडी संपल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले असता, त्यांना पुन्हा 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर संजय राऊतांची रवानगी आर्थर रोड कारागृहात करण्यात आली होती.

आर्थर रोड कारागृहात संजय राऊत यांना घरचे जेवण आणि औषधी पुरवण्याची मुभा देण्यात आली. त्यानंतर पुन्हा त्यांना 5 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. 5 सप्टेंबर रोजी संजय राऊतांची न्यायालयीन कोठडी संपली असून त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. संजय राऊतांचा कारागृहातील मुक्काम वाढला असून न्यायालयाने त्यांना 19 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

काय आहे प्रकरण?

गोरेगावमध्ये गुरुआशिष कंपनीला चाळीच्या पुनर्विकासाचे काम देण्यात आले होते. कंपनीशी संबंधित प्रवीण राऊत यांनी या जागेतील एफएसआय परस्पर विकल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. गोरेगाव पश्चिमेतील सिद्धार्थनगर भागातील या झोपडपट्टीचे काम न करताच परस्पर काही वर्षांपूर्वी येथील एफएसआय बेकायदेशीररित्या विकण्यात आला. यात जवळपास 1 हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा ईडीला संशय आहे. तसेच, प्रवीण राऊत यांनी 55 लाख रुपये संजय राऊत यांच्या पत्नीच्या बँक खात्यात ट्रान्सफर केल्याचेही समोर आले आहे. या पैशांचा स्त्रोत काय, याचा शोधही ईडी घेत आहे. या संपूर्ण घोटाळ्यात संजय राऊत यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे ईडीचे म्हणणे आहे.

बातम्या आणखी आहेत...