आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची कोल्हापूर ही सासरवाडी आहे. त्याच्या सासरवाडीलाच सीमावादाचे सर्वाधिक चटके बसत आहे. त्यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर अमित शहा यांनी ठोस भूमिका घ्यावी, असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.
आजच्या बैठकीकडे लक्ष
आज अमित शहा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी सीमावादावर दिल्लीत चर्चा करणार आहेत. यापार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी कर्नाटक तसेच, शिंदे सरकारवर टीकेची झोड उठवली.
संजय राऊत म्हणाले, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पत्नी या कोल्हापूरच्या आहेत. कोल्हापूर हे महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर असल्याने या जिल्ह्याला सीमावादाचे सर्वाधिक चटके बसत आहेत. त्यामुळे आता तरी अमित शहा यांनी सीमावादावर ठोस भूमिका घेऊन तोडगा काढावा.
मराठी भाषिकांची गळचेपी
महाराष्ट्र व कर्नाटक दोन्ही राज्यांत भाजपचे सरकार आहे. महाराष्ट्रातही भाजपचेच मुख्यमंत्री आहेत, असा टोला संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना लगावला. पुढे संजय राऊत म्हणाले, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणतात गृहमंत्री अमित शहांशी बोलून फायदा नाही. सीमेवरील 56 गावांत कर्नाटक पोलिस धुडगूस घालत आहेत. गेल्या 70 वर्षांपासून सीमाभागातील मराठी भाषिकांची गळचेपी सुरू आहे.
संजय राऊत म्हणाले, गरज पडल्यास सीमाभागात केंद्र सरकार स्वत:चे संरक्षण दल पाठवू शकते. भाषिक वादासंदर्भात अल्पसंख्याक कमिशन नेऊन तसा निर्णय घेऊ केंद्र सरकार घेऊ शकते. आज दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत, असा निर्णय झाल्यास त्याचे स्वागतच केले जाईल. आज सीमावादावर सकारात्मक निर्णय झाल्यास त्यावर टीका करण्याची आवश्यकता नाही, असेही संजय राऊतांनी स्पष्ट केले.
अधिवेशनात ठराव मांडणार
संजय राऊत म्हणाले, येत्या हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर निश्चितपणे ठराव मांडण्यात येईल. सीमावादावर विरोधक महाराष्ट्र सरकारला जाब विचारणार. तसेच, सीमावादाचे प्रकरण न्यायालयात आहे, म्हणून केंद्र सरकार यात हस्तक्षेप करू शकत नाही, असे नाही. कर्नाटक सरकारचे धाडस दिवसेंदिवस वाढत असून बसवराज बोम्मई आता महाराष्ट्रातील इतर भागांवरही आपला दावा सांगत आहेत. अशात तोडगा काढण्यासाठी निर्णय घेण्याचा केंद्र सरकारला पूर्ण अधिकार आहे.
चीनी घुसखोरीचा दोष नेहरूंवर कशाला?
चीनने आता तवांगमध्ये घुसखोरी केली आहे. भारतीय जवानांनी मोठ्या हिंमतीने त्यांना परतावून लावले. पण, याचा दोष पंडित नेहरूंना देऊन केंद्र सरकार काय साध्य करू पाहत आहे, असा टोलाही संजय राऊतांनी लगावला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.