आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजय राऊतांनी घेतली बाळासाहेब थोरातांची बाजू:म्हणाले- नेत्याच्या आजाराचा गैरफायदा घेऊन कटकारस्थान करणे किळसवाणे

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यातील वाद आता चव्हाट्यावर आले आहेत.

बाळासाहेब थोरात यांनी थेट पक्षश्रेष्ठींकडे पत्र लिहून नाना पटोलेंसोबत काम करणे अशक्य आहे, असे म्हटल्याचे समोर येत आहे. यावर आज संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत बाळासाहेब थोरात यांची बाजू घेत नाना पटोलेंवर अप्रत्यक्षपणे टीका केली.

संजय राऊत म्हणाले, बाळासाहेब थोरात काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत. थोरात यांच्याविषयी आमच्या मनात आदर आहे. या वादावर दिल्लीतील प्रमुख नेत्यांनी माझे मत घेतले आहे.

हे माणुसकीला धरुन नाही

पुढे संजय राऊत म्हणाले, अपघातामुळे बाळासाहेब थोरात यांच्यावर अनेक दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एखाद्या नेत्याच्या आजाराचा गैरफायदा घेऊन कटकारस्थान रचणे अमानूष तसेच किळसवाणे आहे. हे माणुसकाला धरुन नाही.

निशाणा नाना पटोलेंवर

असे वक्तव्य करुन संजय राऊतांनी थेट नाना पटोलेंवरच अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. सत्यजित तांबे यांनी काही दिवसांपूर्वीच पत्रकार परिषद घेत आपल्या कुटुंबाच्या बदनामीचे षड्यंत्र रचले, अखेरच्या क्षणी मला चुकीचे एबी फॉर्म दिले, असा गंभीर आरोप नाना पटोलेंवर केला होता.

त्यावरुनच नेत्याच्या आजारपणात त्याच्याविरोधात कटकारस्थाने रचणे किळसवाणे असल्याचे म्हणत संजय राऊतांनी नाना पटोलेंनाच लक्ष्य केल्याचे बोलले जात आहे.

बाळासाहेब थोरातांचे पक्षश्रेष्ठींना पत्र

दरम्यान, नाना पटोलेंविरोधात बाळासाहेब थोरात यांनी थेट पक्षश्रेष्ठींकडेच तक्रार केल्याची माहिती आहे. तसेच, या वादावर काल प्रथमच बाळासाहेब थोरात यांनी मौन सोडले.

आपल्या वाढदिवसानिमित्त काल नागरिकांशी ऑनलाईन संवाद साधताना बाळासाहेब थोरात म्हणाले, सत्यजित तांबे चांगल्या मताने विजयी झाले, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. जे राजकारण झालं ते व्यथित करणारे आहे, ही वस्तूस्थिती आहे. माझ्या भावना काँग्रेस पक्षश्रेष्ठींना कळवल्या आहेत.

तसेच, हे पक्षीय राजकारण आहे, कुठे बाहेर बोलले नाही पाहिजे, या मताचा मी आहे. पक्षपातळीवर आणि माझ्या पातळीवर आम्ही योग्य तो निर्णय घेणार आहोत,' असा इशारा बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे.

संबंधीत वृत्त

सत्यजित जिंकले, पण खूप राजकारण झाले:त्यामुळे मी व्यथित; आपल्याला पार भाजपपर्यंत नेऊन पोहचवले! - बाळासाहेब थोरात