आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची 'ईडी'कडून अचानकपणे चौकशी सुरु असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या सर्वांविरोधात आता शिवसेना नेते संजय राऊतांनी भाष्य केले आहे. केंद्रीय तपास यंत्रणांची पोलखोल आपण करत राहू, तसेच ईडीच्या अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचारही समोर आणू, त्यासाठी कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी चालेल. असा इशारा राऊतांनी दिला आहे.
संजय राऊतांनी मलिकांवरील कारवाईनंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केंद्रीय तपास यंत्रणा आणि केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. नवाब मलिक हे सत्य बोलत आहेत, भाजपविरोधात आवाज उठवत आहेत, यामुळेच ईडीकडून त्यांच्याविरोधात कारवाई होत आहे. मात्र, आम्ही घाबरणार नाही. ही लढाई सुरूच राहील. परंतु, केंद्रीय तपास यंत्रणांनी 2024 नंतर परिणामांना सामोरे जाण्यास तयार राहावे असे राऊत म्हणाले.
हे 2024 पर्यंत चालेल
संजय राऊत म्हणाले की, 'हे सर्व 2024 पर्यंत चालणार आहे. त्यानंतर ते आहेत आणि आम्ही आहोत. आमच्याविरुद्ध कितीही कारवाई केली किंवा बनावट आरोप केले तरी या देशात सत्याचाच विजय होतो. महात्मा किरीट सोमय्यांनी याआधी सध्या भाजपमध्ये असलेल्या नेत्यांविरोधातही केंद्रीय तपास यंत्रणांना पुरावे दिले होते. मग ईडी ही फक्त महाविकासआघाडीच्या नेत्यांविरोधात कारवाई का करत आहे? आता ही सर्व प्रकरणे घेऊन आम्ही ईडीकडे जाणार आहोत. तक्रार कशी करायची हे आम्हाला देखील माहिती आहे.' असे राऊत म्हणाले.
केंद्रीय तपास यंत्रणांची पोलखोल करणारच
राऊतांनी यावेळी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, 'ईडीची कारवाई ही केवळ महाविकासआघाडी, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष किंवा लालू यादव यांच्या पक्षापुरतीच मर्यादित का आहे? तसेच मी केंद्रीय तपास यंत्रणांची पोलखोल तर करणारच आहे. मी एकेक अधिकाऱ्याला उघडं पाडणार आहे. यानंतर माझ्याविरोधात काय कारवाई होईल, याची पर्वा नाही. मी या सगळ्याची किंमत मोजायला तयार आहे'
मलिकांची ईडीकडून चौकशी
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांना ईडीने चौकशीसाठी अधिकाऱ्यांनी अचानकपणे नेले असल्याची माहिती आहे. आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास नवाब मलिक यांनी ईडी कार्यालयात नेण्यात आले. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची संपत्ती खरेदी केल्याप्रकरणात ईडी आणि इतर तपास यंत्रणांकडून कारवाई केली जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.