आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा कोण जास्त अपमान करतो? यासाठी भाजप नेत्यांमध्ये स्पर्धा सुरू आहे. मात्र, त्यांना महाराष्ट्रातील जनतेकडून प्रत्युत्तर मिळेल. करारा जबाब मिलेगा, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
जनता शिवसेनेसोबत
संजय राऊत सध्या पक्षबांधणीसाठी नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना राऊत म्हणाले, तुरुंगातून सुटल्यावर माझा हा पहिलाच दौरा आहे. संपूर्ण महाराष्ट्रात फिरणार आहे. आमचे संपूर्ण नेते फिरत आहेत. संपूर्ण राज्यात आम्हाला जनतेचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. 40 खोके शिवसेनेतून फुटून गेले असले तरी शिवसेना जाग्यावरच आहे. जनता शिवसेनेच्या पाठिशी आहे. गद्दारीनंतरही शिवसेनेला अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. आदित्य ठाकरे यांनाही जनतेचे समर्थ मिळत आहे. येत्या काळात शिवसेना आणखी पुढे जाईल.
महाराष्ट्र डोळे बंद करून बसलेला नाही
पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शिंदेंच्या बंडाची तुलना थेट शिवरायांच्या आग्रा येथील सुटकेशी केली. त्यावरही संजय राऊत यांनी हल्लाबोल केला. संजय राऊत म्हणाले, सरकारच्या प्रमुख लोकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा कोण जास्त अपमान करतो, याची जणू काही स्पर्धाच लागली आहे. त्यानुसारच आता राज्याचे पर्यटनमंत्री असलेल्या मंगलप्रभात लोढा यांनी असे बेजबाबदार वक्तव्य केले आहे. मात्र, महाराष्ट्रातील जनता डोळे बंद करून बसलेली नाही. अपमान करणाऱ्यांना करारा जबाब मिलेगा, असा इशारा राऊतांनी दिला.
लोढा हे पर्यटनमंत्री
संजय राऊत म्हणाले, मंगलप्रभात लोढा हे राज्याचे पर्यटनमंत्री आहेत. त्यांना तरी शिवाजी महाराजांचा खरा इतिहास माहिती पाहीजे. शिवाजी महाराजांचा इतिसाह जाणून घेण्यासाठी जगभरातून पर्यटक महाराष्ट्रात येतात. इतकेच नव्हे तर आग्रा येथील किल्ल्याला भेट देतानाही पर्यटक शिवाजी महाराजांबाबत जाणून घेतात. त्यामुळे छत्रपतींची शिंदेंशी तुलना करणे किती अयोग्य आहे, याची जाण पर्यटनमंत्र्यांना पाहिजे.
शिंदे गटाचे आमदार हे मांजर
संजय राऊत म्हणाले, सध्या शिंदे-फडणीस सरकारमधून जो उठतोय तो छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतोय. अभिमान, स्वाभिमानाच्या गप्पा करत 40 आमदार शिवसेना सोडून गेले. मात्र, छत्रपतींचा अपमान होत असताना ते मांजरीसारखे डोळे बंद करून बसलेत. त्यांना आता छत्रपतींचा अवमान दिसत नाही का? हे आमदार नव्हे तर मांजर आहेत, अशी घणाघाती टीका राऊतांनी केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.