आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करून स्वतःकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा टोला संजय राऊत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना लगावला. ते मुंबईत बोलत होते.
पवारांच्या ताब्यात जाणारा सुटत नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर जादूटोणा करण्यात आला. त्या जादूटोण्यात उद्धवजी चालले गेले, अशी टीका बावनकुळे यांनी आज केली. त्याला आज राऊत यांनी उत्तर दिले.
भान ठेवून बोला...
संजय राऊत म्हणाले की, शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील यांच्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य करून स्वतःकडे लक्ष आकर्षित करणे हे जर भाजपच्या नेत्याचे काम झाले असेल, तर याचा अर्थ ते स्वतःच्या कामावर, कार्यावर उभे नाहीयत. त्यांना आमच्यावरती चिखलफेक करून प्रसिद्धी मिळवायची असेल, तर त्यांनी थांबवायला पाहिजे. शरद पवार, उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे प्रमुख नेते आहेत. याचे भान त्यांच्यावर चिखलफेक करणाऱ्यांनी लक्षात घेतले पाहिजे. आपण त्यांच्यावर चिखलफेक करताय. आपले कर्तृत्व काय आहे. फक्त आपल्याकडे अमर्याद सत्ता आहे. म्हणून तुम्ही अशी विधाने करणार असाल आमच्या नेतृत्वावर. त्यांचे विधान मला माहिती नाही,पण अशी विधाने कोणीही करू नये.
शिवसेनेशी लढा
राऊत म्हणाले, त्यांना मला उत्तर देता येत नव्हते, म्हणून मला शंभर दिवस तुरुंगात डांबले. हे बारा खासदारांनी सांगितले ते बरे केले. मी दोन दिवस कटुता विसरावी हे बोलतोय, ते ही त्यांना पटत नाही का. महाराष्ट्राच्या राजकारणात कटुता राहू नये, हे देवेंद्र फडणवीसांचे वक्तव्य आशादायी आहे, असे जेव्हा मी म्हणालो. ते ही त्यांना आवडत नाहीय. या अशा प्रकारच्या भूमिका घेणाऱ्यांना महाराष्ट्र कळला नाही. त्यांना बाळासाहेब ठाकरे कळले नाहीत. यशवंतराव चव्हाण कळले नाहीत. या महाराष्ट्राची परंपरा काय आहे. तुम्ही माझ्याशी काय लढताय, शिवसेनेशी लढा, असे आव्हान त्यांनी दिले.
पुन्हा शिवशक्ती-भीमशक्ती
बाबासाहेब आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरे हे दोघेही संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात हातात हात घालून काम करत होते. महाराष्ट्राच्या अस्मितेविषयी बाबासाहेब आंबेडकर यांची प्रखर मते आहेत. आणि ती इतिहासात नोंदली गेली. प्रबोधनकार ठाकरे यांनी बाबासाहेबांना संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सहभागी होण्याची विनंती केली होती. आणि बाबासाहेब आले. हे आजोबांचे नाते आहे. ते नातवांपर्यंत पोहचलेले आहे. प्रकाश आंबेडकरांविषयी माझ्या मनात सदैव आदर राहिलेला आहे. आंबेडकर ही एक ताकद आहे. ठाकरे ही एक ताकद आहे. ही ताकद जेव्हा एकत्र येईल, तेव्हा महाराष्ट्राच्या नव्हे देशाच्या राजकारणाचे चित्र तुम्हाला बदलेले दिसेल, असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला.
शिवसेना उसळी घेईल
संजय राऊत म्हणाले, पक्षाच्या बैठका सुरू आहेत. मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होतायत. पक्षप्रमुख काही सूचना देतायत. भविष्यात शिवसेना या महाराष्ट्रामध्ये अधिक ताकदीने उसळी घेईल असे वातावरण मी पाहतो आहे. सगळ्यांचा विश्वास हा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर आहे. सध्याचे बुडबुडे आता हळूहळू फुटायला लागलेले आहेत. राऊत पुढे म्हणाले की, मला शिवसेनेची लाट परत येताना दिसते आहे. त्याचा परिणाम भविष्यात महाराष्ट्राच्या राजकारणावर होईल. आज तीन जिल्ह्यांचे लोक, पदाधिकारी इकडे मोठ्या प्रमाणात आले होते. त्यांना उद्धव ठाकरे यांनी पक्ष बांधणीसाठी ज्या सूचना दिल्या आहेत, त्या महत्त्वाच्या आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.