आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्याशी संबंधित 10 ठिकाणांवर ED अर्थात अंमलबजावणी संचलनालयाने धाड टाकल्या. या कारवाईवर शिवसेनेने संताप व्यक्त केला आहे. आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही. हिंमत असेल तर घरी या आणि अटक करा. सुरुवात तुम्ही केली आता शेवट आम्ही करू अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राउत यांनी दिली आहे. ईडी असो की मग कुणीही असो, एखाद्या राजकीय पक्षाच्या शाखेप्रमाणे काम करू नये असेही संजय राउत यांनी ठणकावले आहे.
काहीही करा, पुढची 25 वर्षे तुमची सत्ता येत नाही
हे सरकार पुढील 4 वर्षेच नाही तर पुढची 25 वर्षे सत्तेत राहील. काहीही झाले तरी आमचे आमदार आणि नेते कुणाला शरण जाणार नाहीत. आम्ही लढत राहू. ईडीचा किंवा कुणाचा दबाव सरकारवर आणणाऱ्यांनी लक्षात घेतले पाहिजे की हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. तुम्ही कितीही दबाव आणा, कितीही दहशत निर्माण करा. पुढील 25 वर्षे तुमची सत्ता येणार नाही ही काळ्या दगरावरची रेष आहे. हे स्वप्न आता विसरूनच जा. आज जर सुरुवात तुम्ही करत असलात तरी त्याचा शेवट कसा करायचा हे आम्हाला नक्कीच माहिती आहे असा इशारा राउत यांनी माध्यमांशी बोलताना दिला आहे.
संजय राऊत एवढ्यातच थांबले नाहीत. पुढे जात ते म्हणाले, "ते (ईडी) ज्या लोकांचे आदेश पाळत आहेत, त्यांच्या 100 माणसांची यादी मी देतो. त्यांचे काय धंदे, उद्योग आहेत, मनी लाँड्रिंग कशा पद्धतीने चालते आणि निवडणुकीत पैसा कुठून पैसा येतो इथपासून तो कसा वापरला जातो, कोणाच्या माध्यमातून येतो, बेनामी काय आहे वैगेरे याची कल्पना ईडीला नसली तरी आम्हाला आहे. पण गेल्या काही वर्षांपासून केंद्रीय तपास यंत्रणा, न्यायव्यवस्था, कायदा हा सत्ताधाऱ्यांचा गुलाम, चाकर आणि नोकर असल्यासारखे वागत असतील तर आम्ही पर्वा करत नाही. तुम्ही कितीही नोटीसी पाठवा, धाडी टाका, खोटी कागदपत्रे सादर करा पण विजय शेवटी सत्याचाच होईल. फक्त महाराष्ट्रातच सत्यमेव जयतेचा विजय होऊ शकतो."
भाजपशासित राज्यांत अशा कारवाया होत नाहीत -बाळासाहेब थोरात
प्रताप सरनाईक यांच्या घरात ईडीने शोधमोहीम सुरू केल्यानंतर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही संताप व्यक्त केला. "संस्थांचा वापर राजकारणासाठीच केला जातो. भाजपशासित राज्यातील नेत्यांवर अशी कारवाई झाल्याचे कधी ऐकले नाही. पण, जे भाजपच्या विरोधात भूमिका घेतात त्यांना त्रास होतो. असे थोरात म्हणाले आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.