आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप तुमचा वापर करत आहे:संजय राऊत यांचे एकनाथ शिंदेंना खडेबोल; म्हणाले - भविष्यात किती मोठी चूक केली ते कळेल

मुंबई19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजप तुमचा वापर करत आहे. पोलिसांचा वापर करत शिवसैनिकांवर हल्ला करून तुम्ही शाखा ताब्यात घेत असाल, तर ते मुख्यमंत्री पदावरील व्यक्तीला शोभणारे नाही. भविष्यात तुम्हाला तुम्ही किती मोठी चूक केलीय ते कळेल, असे खडेबोल खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुनावले.

भगवा रंग आम्हाला प्रिय आहे. मात्र, कोणत्याही रंगाची मक्तेदारी कोणाकडे नाही. कोणता रंग कोणाची मोनोपॉली नाही. मात्र, शिवसेना प्रमुखांनी आम्हाला भगव्यावर प्रेम करायला शिकवल्याचेही त्यांनी सांगितले. ठाण्यात शिवसेनेची शाखा शिंदे गटाने ताब्यात घेतली आहे. त्यानंतर पुन्हा आरोप-प्रत्यारोप सुरू झालेत. येणाऱ्या काळात हा संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे.

सत्तेचा वापर करून...

संजय राऊत पुढे म्हणाले की, ज्या प्रकारे पोलिस, सत्तेचा वापर करून जे काही ते ओढून नेत आहेत, ते आम्ही वापस आणू. ही काही दिवसांची गोष्ट आहे. ना ही सत्ता राहील, ना ही दादागिरी राहील. आमच्या लोकांविरोधात पोलिसांचा वापर होतोय, याचा अर्थ तुम्ही घाबरले आहात. मर्द असाल, तर आमच्यासमोर येऊन आमच्याशी सामना करा. पाहून घेऊ. सरकार तर पडेलच. फक्त सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहा.

मर्द असाल तर...

संजय राऊत म्हणाले की, हे फक्त ठाण्यातच सुरू आहे. कारण या गटाचे अस्तित्व ठाण्यापुरतेच आहे. हे काही स्वतःला शिवसैनिक म्हणवून घेणाऱ्याचे काम नाही. मर्द असाल, तर समोर या. पोलिसांच्या आडून हल्ले करू नका. यांचे ठाण्याबाहेरचे अस्तित्वही लवकरच नष्ट होईल. हे फार काळ टिकणार नाही. विशेषतः खेडच्या सभेनंतर सगळ्यांच्या पायाखालची जमीन हादरली आहे. आता ठाकरे मालेगावमध्ये जातील, संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढतील. कसब्यात आम्ही विजय मिळवला. मात्र, चिंचवडमधला विजय भाजपचा नाही. हे सगळे पाहिल्यावर भाजप, मिंधे गट यांच्यापुढे काही पर्यायच नाही. पण आमचा शिवसैनिक कुठेही मागे हटणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

सत्ता आज आहे...

संजय राऊत पुढे म्हणाले की, सत्ता आज आहे उद्या नाही. त्यामुळे ठाण्यात जे चालले आहे, ते थांबवा. भारतीय जनता पक्ष तुमचा वापर करत आहे. भविष्यात तुम्हाला कळेल तुम्ही किती मोठी चूक केलीय ते. शिवसैनिकावर हल्ला करून तुम्ही शाखा ताब्यात घेत असाल, पोलिसांचा वापर करून ते मुख्यमंत्री पदावरी व्यक्तीला शोभणारे नाही. सत्ताधारी बेकायदेशीर आहेत.

बातम्या आणखी आहेत...