आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिंदे गटाचे आमदार मलाच गद्दार म्हणत असतील तर हा माझा सन्मान समजतो. मात्र, मला शिव्या देण्याआधी त्यांनी शिवरायांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांना शिव्या द्याव्यात. आम्ही त्यांच्यावर फुले उधळू, अशी टीका आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली.
आज पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, शिंदे गटाला आमच्याकडूनच सन्मान करून घेण्याची संधी देतोय. त्यांनी शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना शिव्या द्याव्यात. मात्र, तुमची महाराष्ट्र अस्मिता थंड पडलीये. त्यामुळेच तुम्ही शिवरायांच्या अपमानानंतरही गप्प आहात.
मोदींची तुलना रावणाशी
भाजपवर टीका करताना संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रात सध्या ढोंगाची लाट आलीये. महाराष्ट्राच्या राज्यपालांपासून मंत्र्या-संत्र्यांपर्यंत प्रत्येकजण आता शिवशाहीर असल्याच्या आविर्भावात डफावर थाप मारीत आहे. मात्र, हे त्यांचे ढोंग आहे. गुजरातमध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खरगे यांनी पंतप्रधान मोदींना रावण म्हणताच भाजप चवताळून उठला. हा गुजरात अस्मितेचा अपमान असल्याचे भाजपचे म्हणणे आहे. मग, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान हा महाराष्ट्र अस्मितेचा अपमान नाही का?, असा सवाल राऊतांनी केला.
उदयनराजेंना समर्थन
राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत खासदार उदयनराजे भोसले आज रायगडावरून भूमिका मांडणार आहेत. त्यावर संजय राऊत म्हणाले, उदयनराजेंच्या प्रत्येक भावनेशी मी सहमत आहे. त्यांनी या प्रकरणात महाराष्ट्रात जागरुकता आणली.
प्रत्येक मुलीचे रक्षण व्हावे
लव्ह जिहादवरून नाशिक, नागपूरमध्ये नागरिकांचे मोर्चे निघालेत. यावर संजय राऊत म्हणाले, लव्ह जिहादबाबत सर्व पक्षीयांनी एकत्र बसून काय तो निर्णय घ्यावा लागेल. श्रद्धा-आफताब प्रकरणावरून आता हे मोर्चे निघत आहेत. मात्र, यानंतरही अनेक हिंदू मुलांकडून हिंदू मुलींची हत्या झाल्याचे समोर येत आहे. हे सर्व निर्घृण आहे. हे आता थांबायलाल हवं. देशातल्या प्रत्येक मुलीचे रक्षण व्हावे, अशी भूमिका हवी.
बंगळुरूत महाराष्ट्र भवन उभारायचे आहेत
सोलापूर, कोल्हापूर येथे कर्नाटकच्या काही संस्था उभाराव्यात, असे वक्तव्य कर्नाटक मुख्यमंत्री बोम्मई यांनी केले आहे. त्यावर टोला लगावताना संजय राऊत म्हणाले, आम्हालाही बेळगाव, बंगळुरू येथे महाराष्ट्र भवन उभारायचे आहे. आधी याची परवानगी द्या. मग आम्ही तुमच्या मागणीबाबत विचार करू. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद हे बोम्मई यांनीच निर्माण केले आहे. यामागे त्यांचे राजकारण आहे, अशी टीकाही राऊतांनी केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.