आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिंदे सरकार फेब्रुवारी महिना पाहणार नाही:संजय राऊतांचा घणाघात, म्हणाले- मविआचा महामोर्चा हे सरकार उलथवून टाकेल

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाविकास आघाडीचा मोर्चा सरकार उलथवून टाकण्यासाठी टाकलेले पहिले पाऊल आहे. यापुढे गावा-गावात केंद्र सरकार आणि राज्य सरकारविरोधात आंदोलन झाल्याशिवाय राहणार नाही. शिंदे फडणवीस सरकार फेब्रुवारी महिना पाहणार नाही, अशी घणाघाती टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केली.

हे सरकार उलथवून टाकू

महाविकास आघाडीच्या मोर्चाला संबोधित करताना संजय राऊत म्हणाले, आजच्या महामोर्चाने महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना डिसमिस केले आहे. या मोर्चाने इशारा दिला आहे की, शिंदे-फडणीस सरकार तुम्ही फेब्रुवारी महिना पाहणार नाही. या महाराष्ट्रात बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले यांचा अपमान करून कोणी सत्तेत बसू शकणार नाही. हे सरकार उलथवून टाकू.

त्यांच्या डोक्यात गांडुळाचा मेंदू

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे व खासदार संजय राऊत यांच्याविरोधात आज हिंदू संघटनांनी ठाणे बंद पुकारला आहे. त्याला भाजप व शिंदे गटानेही पाठिंबा दिला आहे. यावरून संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर घणाघाती टीका केली आहे. संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्र्यांनीच आपले शहर बंद करण्याचा हा प्रकार मी प्रथमच पाहत आहे. यांच्या डोक्यात गांडुळाचा मेंदू आहे, तो नुसता वळवळत असतो. तुम्ही राज्यकर्ते आहात. विचाराला विचारांनी विरोध केला पाहीजे. आपलेच शहर काय बंद करताय?

संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्री ज्या ठाण्यातून येतात ते ठाणेच ते बंद करत आहे. खरतर त्यांची ऐवढीच ऐपत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचे शहर बंद करण्याचा आदेश देताय आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पाहत बसताय. हे लाचार सरकार आहे.

आजचा मोर्चा भव्यदिव्य

आजच्या महाविकास आघाडीच्या महामोर्चाबद्दल संजय राऊत म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अवमानाविरोधात खरे तर महाराष्ट्र बंद करायला हवा. पण, आज आम्ही मोर्चा काढून आमचा निषेध नोंदवत आहोत. हा मोर्चा भव्यदिव्य असा होणार आहे. पण, या महाराष्ट्र प्रेमींच्या मोर्चालाच सरकारने जाचक अटी लादल्या आहेत.

मोर्चासाठी एवढ्या अटी का?

संजय राऊत म्हणाले, भाषण अशी करा? तशी करू नका?, अशा अटी आम्हाला घातल्या आहेत. त्याऐवजी आम्हाला भाषणच लिहून द्या ना. आमचा आवाज कुणी दाबू शकणार नाही. महाराष्ट्र प्रेमाने भारावलेल्या समस्त महाराष्ट्र प्रेमींचा हा महामोर्चा आहे. त्यामुळे सरकारमध्ये कुणी महाराष्ट्र प्रेमी उरले असतील तर त्यांनीही महाविकास आघाडीच्या मोर्चात सहभागी व्हावे.

महाराष्ट्र प्रेम खोक्यात गुंडाळले

संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केवळ ठाणे बंद करण्याऐवजी आमच्या मोर्चात सहभागी व्हावे. काही वारकऱ्यांना आमच्याविरोधात उभे करून आंदोलन करत आहात. असे राजकारण किती काळ करणार? आता तुम्ही राज्यकर्ते आहात. तशा जबाबदारीने वागले पाहीजे. मात्र, तुमच महाराष्ट्र प्रेम खोक्यात गुंडाळले आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी अजूनही राजभवनावर बसले आहेत.

राऊतांचा निळा फेटा

विशेष म्हणजे संजय राऊत आज निळा फेटा घालून प्रसारमाध्यमांसमोर आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महाराष्ट्रात झाला, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले होते. त्यावरून भाजपने संजय राऊतांना लक्ष्य केले आहे. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी म्हटले आहे की, आपले अज्ञान पाजळण्याची एकही संधी संजय राऊत सोडत नाहीत. परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मस्थळावरुन खोटी माहिती पसरविणे अक्षम्य चूक आहे. हा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न का होतोय?. तसेच, यावरून राऊतांविरोधात भाजपतर्फे माफी मांगो आंदोलनही करण्यात येत आहे. त्याला आज निळा फेटा घालून प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न संजय राऊतांनी केला.

बातम्या आणखी आहेत...