आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेला हवा चिंचवड मतदारसंघ:संजय राऊतांची माहिती, पोटनिवडणुकीबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी उद्या 'मविआ'ची बैठक

मुंबई15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

26 फेब्रुवारीरोजी कसबा व चिंचवड पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे. चिंचवड मतदारसंघाची निवडणूक शिवसेनेने लढवावी, अशी आमची इच्छा असल्याचे आज ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

तर, कसबा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा हे दोन पक्ष निर्णय घेतील, अशी माहितीही संजय राऊत यांनी दिली. कसबा व चिंचवड पोटनिवडणुकीसंदर्भात उद्या महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक होत आहे. त्यात या पोटनिवडणुकीसंदर्भात सर्व अंतिम निर्णय घेतले जातील, असे संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

राष्ट्रवादीचे नेते मातोश्रीवर

संजय राऊत म्हणाले की, पोटनिवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यासाठी अजित पवार, जयंत पाटील आणि सुनील तटकरे काल रात्री मातोश्रीवर आले होते. त्यांनी उद्धव ठाकरेंशी चर्चा केली. महाविकास आघाडीने ही पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यास चिंचवडची जागा शिवसेनेने लढावी, असे आमचे मत आहे. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतरची जागा शिवसेनेने लढावी, अशी आमची इच्छा असल्याचे संजय राऊत म्हणाले.

तर, कसबा पोटनिवडणुकीत मविआमधून कोणत्या पक्षाने निवडणूक लढवायची, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस निर्णय घेतली, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कसबा, चिंचवड पोटनिवडणूक ही बिनविरोध व्हावी, अशी इच्छा व्यक्त केली आहे. एखाद्या आमदाराच्या निधनानंतर तेथे बिनविरोध निवडणूक व्हावी, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे, असे वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केले होते. एकनाथ शिंदेंच्या या वक्तव्याचाही राऊत यांनी समाचार घेतला. संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्राची संस्कृती काय आहे. त्याची कशी रोज पायमल्ली होतेय हे कोणी सांगायला नको. पंढरपूर आणि नांदेड पोटनिवडणुकीत ही संस्कृती दिसली नाही. पुढे संजय राऊत म्हणाले, केवळ अंधेरीची निवडणूक एकप्रकारे बिनविरोध झाली, असे म्हणता येईल. मात्र, याची कारणे वेगळी आहेत. भाजपला अंधेरी पोटनिवडणुकीत जिंकण्याची संधीच नव्हती. त्यामुळे भाजपने ऐनवेळी माघार घेतली.

निवडणूक लढवण्यास हरकत नाही

संजय राऊत म्हणाले की, कसबा, चिंचवड पोटनिवडणूक लढायला हरकत नाही, असा मविआच्या नेत्यांचा सूर आहे. महाविकास आघाडी निवडणुकीतून दूर राहिली तरी ती निवडणूक होणार आहे. काही प्रमुख अपक्ष निवडणुकीत उतरले आहेत. त्यामुळे निवडणूक होईल.

बातम्या आणखी आहेत...