आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या स्वागतासाठी अयोध्येत जय्यत तयारी झाली असून आज शरयूच्या तिरावर शिवसेनेचा उत्सव साजरा होणार आहे, असे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले. आदित्य ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर संजय राऊत अयोध्येत तयारीची पाहणी करत आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तसेच यावेळी त्यांनी विरोधकांनाही लक्ष्य केले.
अयोध्येत आम्ही गेल्या 35 वर्षांपासून येत आहोत. त्यामुळे कोणी आम्हाला हनुमान चालिसा पुस्तक घेऊन राजकारण शिकवण्याचा प्रयत्न करत असेल. त्यांनी ते त्यांच्यापुरते ठेवावे. आमच्या मनात राम आहेत, असे म्हणत त्यांनी राणा दाम्पत्याला टोला लगावला.
शिवसेना नेते अनिल परब यांच्या ईडी चौकशीवर बोलताना ते म्हणाले की, परखडपणे बोलणाऱ्या आणि पक्षवाढीसाठी काम करणाऱ्या नेत्यांना त्रास देण्याचे काम केंद्रीय तपास यंत्रणा काम करत आहे. राजकीय सूड आणि बदला घेतला जात आहे. मुंबईत अनिल परब यांना आलेली नोटीस आणि दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सुरु असलेल्या चौकशीवरून हे स्पष्ट होत आहे. राहुल गांधी यांना रात्री बारा वाजेपर्यंत ईडीच्या कार्यालयात बसवून ठेवले जात आहे. ही हुकूमशाहीची सुरुवात नाही. तर हे हुकूमशाहीचे टोक आहे. हिटलरनेही आपल्या विरोधकांना इतक्या निर्दयीपणे संपवले नसेल.
लोकशाहीचा गळा घोटला
संजय राऊत म्हणाले की, देशातील लोकशाहीचा डंका जगभरात वाजवला जातो. त्याच भारतात लोकशाहीचा गळा घोटला जात आहे. हा देशाच्या स्वातंत्र्याचा पराभव असल्याचेही त्यांनी म्हटले. हा पराभव भाजपच्या नेतृत्वातील सरकारने केला आहे. त्यामुळे स्वतंत्र्याची लढाई पुन्हा लढावी लागेल, अशा प्रकारचे चित्र देशात निर्माण झाले आहे.
मुंबईतून दिल्लीला फोन
महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा आणि पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज्यसभा निवडणुकीमध्ये केंद्रीय तपास यंत्रणाचा वापर करण्यात आला. सुहास कांदे यांचे मत बाद करून शिवसेनेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातो. देशातील कोणतीही यंत्रणा स्वतंत्र आणि निपक्ष आहे, हे पाहावे लागेल. कोणतीही यंत्रणा स्वतंत्रपणे काम करताना दिसत नाही. हे सध्याच्या परिस्थितीवरुन सिद्ध होत आहे. शिवसेनेचं मत बाद करण्यासाठी सात तास लावले. दिल्लीतून आदेश आणला, त्याची माहिती आमच्याकडे आहे. मुंबईतून कोण बोलत होतं, काय सूचना होत्या, याची सगळी माहिती माझ्याकडे आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.