आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मविआत' मतभेद:PM मोदींची डिग्री नव्हे तर बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांचे दाहक प्रश्नांकडे लक्ष द्या; शरद पवारांची ठाम भूमिका

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्रीवरून राजकारण तापलेले आहे. विरोधकांनी डिग्रीबाबत खुलासा करण्याची मागणी केली आहे. मात्र, आता कायम भाजपच्या विरोधात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून पीएम मोदी यांचे समर्थन केले जात आहे. मात्र, अजित पवार, जयंत पाटील यांच्यानंतर आता दस्तुरखुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी डिग्रीपेक्षा अनेक प्रश्न महत्त्वाचे असल्याचे सांगत आपली भूमिका कायम ठेवली आहे.

विशेष म्हणजे ठाकरे गट मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहे. देशाच्या पंतप्रधानांना आपली डिग्री दाखवण्याची लाज का वाटावी, असा सवाल संजय राऊत वारंवार उपस्थित करत आहेत. मोदींची डिग्री संसदभवनाच्या द्वारावर लावा, अशी खोचक मागणीही राऊत यांनी केली होती.

शरद पवार काय म्हणाले?

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिग्रीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भूमिका घेतली आहे. शरद पवार म्हणाले, तुमची डिग्री काय, माझी डिग्री काय, यांची डिग्री काय हे काय प्रश्न आहेत का? मोदींची डिग्री हा देशासमोरचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा नाही. बेरोजगारी आणि शेतकऱ्यांचे दाहक प्रश्न आहेत. विरोधकांनी त्यावर लक्ष केंद्रीय केले पाहिजे. बेकारी, महागाई, कायदा-सुव्यवस्था असे अनेक प्रश्न आहेत. यावर केंद्र सरकारने बोलायला हवे.

डिग्री पाहून निवडून दिले का?

अजित पवार यांनीही मोदींच्या डिग्रीवरुन प्रश्न न उपस्थित करण्याचा सल्ला दिला होता. अजित पवार म्हणाले होते, 2014 ला त्यांची डिग्री पाहून त्यांना निवडून दिले का? मोदींनी देशात 2014 ला स्वत:चा करिश्मा निर्माण केला. यापूर्वी भाजपाचा हा असा करिश्मा जम्मू-काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत नव्हता. त्याचे सर्व श्रेय मोदींनाच दिले पाहिजे. डिग्रीवर काय? असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला होता.

कामाला महत्त्व

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील मोदींच्या समर्थनाची भूमिका घेतली आहे. जयंत पाटील म्हणाले, किती शिकले यापेक्षा ते कसे काम करतात, याला महत्त्व आहे. डिग्री आहे म्हणून ते पंतप्रधान झाले असे नाही, जयंत पाटील यांनी पंतप्रधानांच्या डिग्रीवरुन विरोधाची भूमिका न घेता समजुतीची भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले. आता शरद पवार यांनीही मोदींच्या डिग्रीवरुन विरोध न केल्याने चर्चा होताना दिसून येत आहेत.

राऊतांची जोरदार टीका

संजय राऊत यांच्याकडून वेळोवेळी मोदींच्या डिग्रीवरुन प्रश्न उपस्थित केले जात आहेत. संजय राऊत म्हणाले की, आमच्या पंतप्रधान मोदींची ही डिग्री बोगस आहे असं लोक म्हणतात. मात्र, मला वाटतं की, ‘Entire Political Science’ या संशोधन विषयावरील ही ऐतिहासिक व क्रांतिकारी डिग्री आहे. ही डिग्री नव्या संसद भवनाच्या मुख्य द्वारावर फ्रेम करून लावायला हवी. जेणेकरून लोक पंतप्रधान मोदींच्या योग्यतेवर प्रश्न उपस्थित करणार नाहीत

सामनातूनही टीकास्त्र

ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनातूनही याआधी म्हटले होते की, मोदींच्या बोगस डिग्रीचा विषय सध्या गाजतो आहे. पंतप्रधान होण्यापूर्वी मोदी यांनी जाहीरपणे एका मुलाखतीत व भाषणात सांगितले होते की, "मी शिकलेलो नाही. माझ्याकडे कोणतीही पदवी नाही" व नंतर अचानक मोदी यांची 'एमए'ची पदवी (Entire Political Science) समोर येते व अमित शहा दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन मोदींची 'डिग्री' फडफडवून दाखवतात. त्यामुळे मोदींची डिग्री खरी की खोटी, यावर लोकांनी शंका घेतली तर त्यात मोदींची बदनामी कशी?

मविआत बिघाडी?

अदानी घोटाळ्याच्या चौकशीसाठी जेपीसीपेक्षा सर्वोच्च न्यायालयाची समितीच योग्य राहील, असे स्पष्ट मत शरद पवार यांनी काल पत्रकार परिषदेत मांडले. यानंतर काँग्रेसचे नेते नाना पटोले, अशोक चव्हाण यांनी जेपीसी चौकशीच व्हायला हवी अशी भूमिका मांडली. संजय राऊत यांनीही सत्य समोर येण्यासाठी जेपीसी गरजेचे असल्याचे म्हटले आहे. आता जेपीसीनंतर मोदींच्या डिग्रीवरुनही राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका ठाकरे गटापेक्षा वेगळी आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी तर नाहीना अशा चर्चा होत आहेत.

संबंधित वृत्त

चर्चा:किती शिकले यापेक्षा ते कसे काम करतात याला महत्त्व

किती शिकले यापेक्षा ते कसे काम करतात, याला महत्त्व आहे. डिग्री आहे म्हणून ते पंतप्रधान झाले असे नाही, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पंतप्रधानांच्या डिग्रीवरुन विरोधाची भूमिका न घेता समजुतीची भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले. याआधी अजित पवारांनीही मोदींच्या डिग्रीवरुन विरोध न केल्याने चर्चा होताना दिसून येत आहेत. वाचा सविस्तर