आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछत्रपती संभाजीराजेंना राज्यसभेची उमेदवारी देण्याचा विषय शिवसेनेकडून संपला आहे. त्यावर आता अधिक बोलणार नाही, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज स्पष्ट केले. दरम्यान, संभाजीराजे यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळत नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर संभाजी ब्रिगेड, छावा, मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेला मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशारा दिला आहे. त्यावर जे अशी वक्तव्य करत आहेत, त्यांनी मागील 15 दिवसांच्या घडामोडी समजून घ्याव्यात, असे आवाहनही त्यांनी केले.
शिवसेना काय करू शकते?
संजय राऊत म्हणाले, छत्रपती संभाजीराजे यांचा सन्मान ठेवूनच शिवसेनेच्या कोट्यातील एक जागा त्यांनी देण्यात येत होती. संभाजीराजेंना राज्यसभेवर पाठवण्यासाठी मविआची 42 मते त्यांना देण्यास आम्ही तयार झालो होतो. छत्रपतींनी शिवसेनेचे उमेदवार व्हावे, ऐवढीच आमची भूमिका होती. मात्र, त्यांनी त्यास नकार दिला. त्यामुळे याहून अधिक शिवसेना काय करू शकते. मराठा संघटनांनी हे समजून घ्यावे, असे आवाहन संजय राऊत यांनी केले.
अनेक राजघराणे राजकीय पक्षात
छत्रपती संभाजीराजेंना राजकीय पक्षाचे वावडे असण्याचे काहीही कारण नाही. याआधी त्यांनी राष्ट्रवादीकडून लोकसभेची निवडणूक लढवली आहे. त्यामुळे आम्ही शिवसेनेत येण्याची त्यांना ऑफर दिली तर आमचे कुठे चुकले, असा सवालही संजय राऊत यांनी केला. तसेच, देशभरातील अनेक राजघराण्यांच्या वशंजांनी राजकीय पक्षात येऊन समाजकारण केले आहे. यापुर्वी ज्येष्ठ शाहू महाराज यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता व ते काँग्रेसकडून निवडणूक लढले होते. मालोजीराव भोसलेदेखील राष्ट्रादीकडून निवडणूक लढवून आमदार झाले होते, अशी आठवणही संजय राऊत यांनी करून दिली.
12 कोटी जनतेला समन्स बजावतील
शिवसेना नेते यशवंत जाधव यांना बेनामी मालमत्तेप्रकरणी ईडीने समन्स बजावले आहे. यावर संजय राऊत म्हणाले, राज्यातील बारा कोटी जनतेला ईडीचे लोक समन्स बजावतील. कारण ही जनता मविआच्या बाजूने आहे. या कारवाईतून केवळ भाजपचे लोक ते वगळतील, असा टोलाही त्यांनी लगावला.
देशासमोर चुकीचे आदर्श
दिवगंत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणातील आरोपींची नुकतीच सुटका करण्यात आली आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन त्यांचे स्वागत करतानाचे फोटो व्हायरल झाले आहेत. यावरदेखील संजय राऊत यांनी टीका केली. देशात हा चुकीचा पायंडा पडत आहे. तामिळनाडूचे राजकारण काहीही असले तरी केवळ राजकारणासाठी देशासमोर असे आदर्श येणे योग्य नसल्याचे ते म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.