आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशरद पवार यांनी राजकीय संन्यास घेतलेला नाही. दिल्लीतून व महाराष्ट्रातून भाजप नेस्तनाबूत होत नाही तोपर्यंत शरद पवार काम करत राहतील, याची मला खात्री आहे, असा विश्वास आज ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला.
शरद पवार यांच्या पक्षाध्यक्षपदाच्या राजीनाम्याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले, एका विशिष्ट परिस्थितीत प्रत्येकाला वाटत असते की आपण दुसऱ्यासाठी जागा रिकामी केली पाहीजे. शरद पवारांनी भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे, असे वक्तव्य केले तेव्हाच मला त्यांच्यातील अस्वस्थता जाणवली होती. मात्र, ते तवाच फिरवतील असे वाटले नव्हते. शरद पवारांनी केवळ पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी राजकारणातून संन्यास घेतलेला नाही. या देशातून, राज्यातून भाजप नेस्तनाबूत होत नाही तोपर्यंत शरद पवार काम करत राहतील, अशी मला पूर्ण खात्री आहे.
राजकीय संन्यास नाही
संजय राऊत म्हणाले, शरद पवार देशाच्या राजकारणात काम करत राहतील. ते पक्षाच नेतृत्व करत राहतील. शरद पवारांनी राजकीय संन्यास घेतलेला नाही. ते राजकीय संन्यास घेणारही नाही. असे नेते हे राजकारण आणि समाजकारणाचे प्राण असतात. शरद पवार हे विकासाची दृष्टी असलेले नेते आहेत. निवृत्तीचा विषय त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय असला तरी शरद पवार फक्त पक्षाचे नेते नाहीत. देशातील ते एक महत्त्वाचे नेते आहेत. आम्ही नेहमी शरद पवारांसोबत राहू.
शरद पवारांची ठाकरेंवर नाराजी
दरम्यान, आपल्या 'लोक माझे सांगाती' या राजकीय आत्मचरित्रात शरद पवार यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दलही नाराजी व्यक्त केली आहे. शरद पवार यांनी पुस्तकात म्हटले आहे की, मुख्यमंत्री असताना केवळ दोन वेळा मंत्रालयात जाणे हे आम्हाला पचनी पडणारे नव्हते. अंसतोषाचा उद्रेक शमवायला शिवसेनेचे नेतृत्व कमी पडले. संघर्ष न करता उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्याने महाविकास आघाडीच्या सत्तेला विराम मिळाला, असे स्पष्ट मत शरद पवारांनी व्यक्त केले. त्यावर संजय राऊत म्हणाले, आम्ही हे पुस्तक अद्याप पूर्ण वाचलेले नाही. आत्मचरित्रात व्यक्तिगत भूमिका असतात.
उद्धव ठाकरेंची मुलाखत
पुढे संजय राऊत म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्याशीही याबाबत चर्चा झाली आहे. लवकरच या सर्व घडामोडींवर उद्धव ठाकरे यांची प्रदीर्घ मुलाखत सामनातून येईल. त्यावेळी सर्व शंका, प्रश्नांना सडेतोड उत्तरे दिली जातील. सत्तांतरावेळी जे काही झाले, त्याबाबत प्रत्येकाची वेगळी बाजू, भूमिका आहे. याबाबत आपली बाजू उद्धव टाकरे लवकरच मांडतील.
हेही वाचा,
पवारांची निवृत्ती:'राष्ट्रवादी'च्या अध्यक्षपदावर मंथन; सुप्रिया सुळे यांचे नाव आघाडीवर, ताई दिल्लीत - दादा राज्यात!
शरद पवार आज पुन्हा यशवंतराव चव्हाण सभागृहात आले आहेत. शरद पवार यांच्यासोबत सुप्रिया सुळेदेखील आहेत. येथे दुपारी 1 वाजेपर्यंत शरद पवार हे राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भेट घेणार आहेत. आपण जाहीर केलेल्या पक्षाध्यक्षपदाच्या निर्णयाबाबत शरद पवार कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेणार आहेत. यानंतर शरद पवार निवृत्तीच्या निर्णयाबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे. त्यामुळे शरद पवार काय निर्णय घेतात, याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. वाचा सविस्तर
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.