आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोखठोक:चुंबन घेणे गुन्हा आहे का? संजय राऊत यांचा सवाल, शिंदे-फडणवीसांनी ‘लव्ह जिहाद’ केले; त्यांच्या अनैतिकतेला काय म्हणावे?

मुंबई6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चुंबन घेणे हा गुन्हा आहे का, एकनाथ शिंदे व त्यांच्या लोकांनी फडणवीस यांच्याबरोबर सरळ ‘लव्ह जिहाद’चाच प्रकार केला व उघडपणे अनैतिक पद्धतीने एकत्र राहत आहेत, यास काय म्हणावे? असा थेट सवाल संजय राऊत यांनी आजच्या सामनातून विचारला आहे.

रोखठोक सदरात संजय राऊत यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रात एका जाहीर चुंबनाचे प्रकरण सध्या सगळ्यांचेच मनोरंजन करीत आहे. शिंदे गटाच्या एका आमदाराने त्यांच्याच महिला पदाधिकाऱ्याचे जाहीर चुंबन घेतले. चुंबन घेणे हा गुन्हा आहे काय यावर निर्णय व्हायला हवा. चुंबन हा गुन्हा नसेल तर मग शिवसैनिकांना अटक करण्याचे कारण काय? महाराष्ट्रातील सरकारला चुंबनाचे वावडे कधीपासून झाले?

‘नाटू नाटू’चा प्रकार

महाराष्ट्रात ‘चुंबना’वर चर्चा सुरू आहे. शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. देशात ईडी, सीबीआयने भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. गौतम अदानीच्या विरोधात वातावरण तापले आहे. त्यावर पाणी टाकण्यासाठी विरोधकांच्या घरांवर धाडी व अटका सुरू आहेत. सगळाच ‘नाटू नाटू’चा प्रकार असल्याची टीका आजच्या सामनाच्या रोखठोक या अग्रलेखातून करण्यात आली आहे.

शरण जाणार नाही

रोखठोकमध्ये संजय राऊत यांनी लिहिले आहे, हा मजकूर लिहीत असताना सीबीआयचे पथक लालू यादव यांच्या घरी पुन्हा पोहोचले आहे. किडनीच्या विकारामुळे लालू यादव यांचा आवाज क्षीण झाला आहे. त्यांच्या हालचालींवर मर्यादा आल्या आहेत. त्याही अवस्थेत त्यांनी मोदी सरकारला सुनावले. ‘मी शेवटपर्यंत लढेन, पण शरण जाणार नाही.’ तेलंगणाचे मुख्यमंत्री के. सी. चंद्रशेखर राव यांची कन्या कविता यांना ‘ईडी’ने समन्स पाठवले. नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्या अवतीभवतीच राजकारण फिरत आहे.

विरोधकांना जेरीस आणतात

सामनात म्हटले आहे, विरोधक लढण्याच्या मूडमध्ये आहेतच, पण विरोधकांत अद्यापि एकीचे दर्शन होत नाही. हेच श्री. मोदी व शहांचे बलस्थान आहे. ‘ईडी’सारख्या संस्था कायद्याचा गैरवापर करून विरोधकांना जेरीस आणतात. त्याविरुद्ध सर्व विरोधी खासदारांनी एकत्र येऊन ‘ईडी’ कार्यालयावर मोर्चा काढावा. गौतम अदानी यांनी केलेल्या लुटमारीची तक्रार ‘ईडी’ संचालकांकडे करावी असे ठरले; पण त्या तक्रारीवर ममता बॅनर्जी यांची तृणमूल काँग्रेस व महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसने सह्या केल्या नाहीत. ‘ईडी’वरील मोर्चातही हे पक्ष सामील झाले नाहीत.

यंत्रणांचा बेगुमान गैरवापर

सामनात म्हटले आहे, प्रश्न गौतम अदानी यांचा नसून ज्या पद्धतीने विरोधकांना चिरडले जात आहे तो विषय महत्त्वाचा आहे. तृणमूल आणि राष्ट्रवादीदेखील ‘ईडी’च्या वरवंट्याखाली भरडून निघाली आहे. पोलिस तपास यंत्रणांचा इतका बेगुमान गैरवापर कधीच झाला नव्हता.

क्राऊड फंडिंग

सामनात म्हटले आहे, ‘क्राऊड फंडिंग’ व त्या पैशांचा गैरव्यवहार हा मनी लाँडरिंग कायद्याच्या अंतर्गत येणारा विषय. साकेत गोखले हा तृणमूल काँगेसचा प्रवक्ता सध्या याच गुन्ह्याखाली ‘ईडी’च्या अटकेत आहे व चार महिने उलटले तरी त्याला जामीन मिळत नाही.

सामनात म्हटले आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख लोक आजही आणीबाणीत इंदिरा गांधी यांनी देशाचा कसा जेलखाना केला त्यावर प्रवचने देतात. मग आज भाजपच्या राजवटीत जेलखान्याचे नक्की कोणते स्वरूप संघाला दिसते? नको असलेले विरोधक तुरुंगात टाकायचे हा फॅसिजम आहे. संघाच्या लोकशाही परंपरेत हे बसते काय?

सर्वच बेकायदेशीर

सामनात म्हटले आहे, महाराष्ट्राचे सरकारही मोदींप्रमाणे बेकायदेशीर पद्धतीनेच राजशकट चालवीत आहेत. शिवसेनेच्या शाखांत पोलीस घुसवून शिंदे गटाचे लोक ताबा मिळवत आहेत. पैसा व पोलिसी बळाचा वापर करून कार्यालयांवर ताबा मिळवाल, पण जनभावना कशी विकत घेणार, हा प्रश्न आहे.

भीतीचे राज्य

सामनात म्हटले आहे, देशात भीतीचे वातावरण आहे. माणसाचे शोषण हे भीतीच्या माध्यमातून केले जाते. आज गुडघे टेकण्याची स्पर्धा त्याच भयातून सुरू आहे. भारतीय जनता पक्षात सामील व्हा, गप्प बसा, नाहीतर तुरुंगात जा, असे सध्या सुरू आहे. एकनाथ शिंदे व त्यांच्या चाळीस लोकांवर अशीच भीतीची तलवार टेकवली व त्यांना शरण आणले हे आता लपून राहिलेले नाही.

बातम्या आणखी आहेत...