आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजय राऊतांचा चिमटा:शीतल म्हात्रेंचा व्हिडिओ खरा की खोटा?, हे आधी शोधा; मग मॉर्फिंगबाबत तपास करण्याची मागणी

12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा व्हायरल झालेला व्हिडिओ खरा आहे की खोटा?, याचा आधी शोध घ्या. त्यानंतर तो व्हिडिओ मॉर्फ केला आहे की नाही?, याचा तपास करा, अशी खोचक मागणी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली आहे.

आमदार प्रकाश सुर्वेंचे काय म्हणणे?

आज पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, व्हायरल व्हिडिओत असलेल्या पुरुष आमदाराचे काय म्हणणे आहे?, हेही एकदा जाणून घ्यायला हवे. याबाबत आतापर्यंत त्यांनी काहीच तक्रार केलेली नाही. त्यांची याबाबत काहीच तक्रार नाहीये का? अशा व्हिडिओंमुळे केवळ महिलांचीच बदनामी होते का? पुरुषांची बदनामी होत नाही का?, असा टोला संजय राऊतांनी प्रकाश सुर्वेंना लगावला.

केवळ सुडाचे राजकारण

दरम्यान, व्हायरल व्हिडिओवरुन ठाकरे गटाच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यावर संजय राऊत म्हणाले, संपूर्ण देशभरात ती चित्रफीत व्हायरल झाली आहे. लाखो लोकांनी ती चित्रफीत बघितली आहे. मग काय लाखो, कोट्यवधी लोकांना अटक करणार आहात का? तसेच, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने एसआयटीचीही स्थापना केली आहे. त्यावर एसआयटी स्थापन करावा, अशा अनेक गोष्टी सध्या राज्यात घडत आहेत. मात्र, काही गोष्टी केवळ राजकारण आणि सुडापोटी केल्या जात आहेत, अशी टोला संजय राऊतांनी लगावला.

शिंदे गटातील मेगाभरती कुचकामी

दरम्यान, ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांचे चिरंजीव भूषण देसाई यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यावर संजय राऊत म्हणाले, शिंदे गट पूर्वी बाप पळवत होता, आता मुलेही पळवायला लागले आहेत. मुळात भूषण देसाई यांचा शिवसेनेशी काहीही संबंध नाही. ते सक्रिय राजकारणात नव्हते. शिंदे गटाची ही मेगाभरती कुचकामी आहे.

भाजपची वॉशिंग मशीन खराब होईल

संजय राऊत म्हणाले, उद्योगमंत्री उदय सामंत यांनीच भूषण देसाईंवर जमीन घोटाळ्याचे आरोप केले होते. त्या आरोपांचे आता काय झाले? भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये त्यांनाही आता धुवून काढले आहे का? भाजप सध्या वॉशिंग मशीनमध्ये इतका कचरा टाकत आहे की, ही वॉशिंग मशीनच खराब होईल.

महाराष्ट्र खदखदतोय

राज्यातील 17 लाख शासकीय कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर गेले आहेत. तसेच, नाशिकपासून शेतकऱ्यांचा लाँग मार्चही मुंबईच्या दिशेने निघाला आहे. त्यावर संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दावा करतात की, जनतेच्या मनातील सरकार सत्तेवर आहे. तसे असते तर आज जनता रस्त्यावर उतरली नसती. जनता सरकारच्या विरोधात आहे. महाराष्ट्र खदखदत आहे.

हेही वाचा,

ठाकरे गटाचा सवाल:कसब्यातील पराभवामुळे ब्राह्मणांसाठी स्वतंत्र महामंडळ काढण्याचा विचार, पण समाजाच्या हाती काय लागणार?

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात विविध मागासवर्गीय समाजांसाठी नवीन महामंडळांची घोषणा केली आहे. तसेच, ब्राह्मण, सी. के. पी. वगैरे खुल्या प्रवर्गातील समाजाची नाराजी दूर करण्यासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचा राज्य सरकारचा विचार असल्याचेही समोर आले. यावर ठाकरे गटाने टीका केली आहे. मराठा, ओबीसी, मातंग अशा अनेक जातबांधवांच्या उत्कर्षासाठी महामंडळांची स्थापना करून मूळ प्रश्न सुटले आहेत काय?, असा सवाल ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात करण्यात आला आहे. वाचा सविस्तर

बातम्या आणखी आहेत...