आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्राच्या सत्ताकारणात आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे यांच्यातील सत्तासंघर्षाचा निकाल आज घोषित करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी केलेल्या 'आज वाट पाहतोय तुमची, नरहरी झिरवळ' या ट्विटची सध्या जोरदार चर्चा होत आहे.
उद्धव ठाकरेंची साथ सोडून गेलेले एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे 16 आमदार अपात्र ठरणार की नाही? याबाबत आज फैसला जाहिर होणार आहे. 16 आमदार अपात्र ठरणार की नाही याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींचे घटनापीठ निर्णय देईल. कोर्टाच्या निकालावरच शिंदे-फडणवीस सरकारचे भवितव्यही अवलंबून आहे.
नॉट रिचेबलच्या चर्चांना सुरुवात
निकालाच्या काही तासांअगोदरच विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ अचानक गायब झाल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र नुकतेच नरहरी झिरवळ यांनी माध्यमांशी संवाद साधत आपण रिचेबल असल्याचे सांगत चर्चांना पूर्णविराम दिला आहे. झिरवळ यांचा फोन लागत नव्हता आणि ते त्यांच्या गावीही नव्हते. त्यामुळे झिरवळ नॉट रिचेबल झाल्याच्या चर्चांना सुरुवात झाली होती.
काय म्हणताय राऊत?
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ट्विट करत राऊत म्हणाले, 'काय झाडी, काय डोंगर, काय हिरवळ, आज वाट पाहतोय तुमची, नरहरी झिरवळ.. जय महाराष्ट्र!' अशा आशयाचे ट्वीट संजय राऊत यांनी केले आहे. संजय राऊत यांच्या या ट्विटची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
पुढे काय होणार?
16 आमदारांनी व्हीपचे उल्लंघन केल्याचे सिद्ध झाल्यास कोर्ट अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवू शकते अन् सिद्ध न झाल्यास क्लीन चिट देऊ शकते. पण आमदारांच्या अपात्रतेबाबत निकाल काहीही आला तरीही बहुमत असल्यामुळे भाजप-शिवसेना युतीच्या सरकारला कुठलाही धोका नसेल. फक्त शिंदेंना पायउतार करून त्यांना दुसरा चेहरा मुख्यमंत्रिपदी बसवावा लागेल. तसे झाल्यास शिंदेसेनेऐवजी भाजपच्या नेत्याला या पदावर संधी मिळू शकते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.