आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना आता 7 फेब्रुवारी रोजी बेळगाव न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बेळगावमध्ये प्रशोभक भाषण केल्याप्रकरणी न्यायालयाने त्यांना आज हजर राहण्याचे समन्स बजावले होते. मात्र, संजय राऊत आज हजर झाले नाहीत.
व्यक्तिगत कारणामुळे गैरहजर
व्यक्तिगत कारणामुळे आज उपस्थित राहू शकत नसल्याचे संजय राऊत यांनी आपल्या वकिलांमार्फत बेळगाव न्यायालयाला सांगितले आहे. आज याप्रकरणी झालेल्या सुनावणीदरम्यान राऊत यांच्या वकिलांनी संजय राऊत यांना हजर राहण्यासाठी पुढील तारीख देण्याची विनंती केली होती. त्यानुसार, न्यायालयाने 7 फेब्रुवारी ही तारीख दिली आहे.
नेमका आरोप काय?
30 मार्च 2018 रोजी बेळगावमध्ये सीमाप्रश्नी संजय राऊत यांनी प्रक्षोभक भाषण केले, असा आरोप त्यांच्यावर आहे. तब्बल 5 वर्षांनंतर संजय राऊत यांना या प्रकरणी कोर्टाने समन्स बजावले आहेत. या समन्सनुसार संजय राऊत यांना आज हजर रहायचे होते. मात्र, कालच राऊतांनी आपण या सुनावणीला हजर राहणार नाही. आपल्यातर्फे वकील जाणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार राऊतांच्या वकिलांनी आज पुढील तारीख देण्याची विनंती कोर्टाला केली.
माझ्यावर हल्ल्याचा कट
2018मध्ये बेळगावमध्ये केलेल्या एका भाषणावरून बेळगाव कोर्टाने मला आता समन्स बजावले आहे. बेळगावमध्ये माझ्यावर हल्ला करण्याचा कट आहे. त्यासाठी संपूर्ण तयारी झाली आहे, असा गंभीर आरोपही संजय राऊत यांनी भाजपच्या कर्नाटक सरकारवर केला आहे. महाराष्ट्रातील इतर मुद्द्यांवरून लक्ष हटवण्यासाठी आणि कर्नाटक निवडणुकीसाठी भाजपने हा डाव रचला आहे. त्यामुळेच वातावरण आणखी तापवण्यासाठी मी बेळगावला गेलो की, माझ्यावर हल्ला होऊ शकतो. अटकही होऊ शकते. मात्र, मी घाबरणार नाही. माझीही पूर्ण तयारी आहे, असे राऊत म्हणाले.
गृहमंत्री शहांनी लक्ष द्यावे
तसेच, कर्नाटक-महाराष्ट्र सीमा वादामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लक्ष घालावे. अन्यथा रक्तपात होईल, असा इशाराही राऊतांनी दिला. राऊत म्हणाले, हा वाद गांभीर्याने घ्यायला हवा. माझी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना विनंती आहे की, त्यांनी याप्रकरणी लक्ष घालावे. अन्यथा रक्तपात होण्याची भीती आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.