आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराश्रीराम हे आदर्श राजे होते, त्यागमूर्ती होते, त्यांनी एक आदर्श राज्य निर्माण केले, त्याचे कारण त्यांचे प्रशासन हे उत्तम होते. जर या देशाला एक आदर्श राष्ट्रपती हवा असेल, एक उत्तम प्रशासक हवा असेल तर सरकारने राष्ट्रपती निवडावा रबर स्टॅम्प निवडू नये, असे मत शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केले. राऊत सध्या अयोध्येत असून तिथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पुढे ते म्हणाले की, देशाला राष्ट्रपती हवा असेल तर शरद पवार हे उत्तम व्यक्ती आहेत, जर रबर स्टॅम्प हवा असेल तर आणखी खूप जण आहेत. शरद पवार हे देशातील मोठे नेते आहेत. त्यांच्याकडे सर्वाधिक अनुभव आहे. कोणतीही राजकीय त्रुटी निर्माण झाली तर आम्ही त्यांच्याकडे सल्ला घेण्यासाठी जातो. उद्या दिल्लीत ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत एक बैठक होत आहे. त्यात सर्व विरोधी पक्षांना बोलावण्यात आले आहे. शरद पवारदेखील त्यात हजेरी लावणार असून त्या बैठकीचे नेतृत्व करणार आहे. उद्याच्या बैठकीत राष्ट्रपतिपदाबाबतची रणनीती ठरवली जाईल, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.
मोदीही मान्य करतील...
पुढे राऊत म्हणाले की, आज जर राष्ट्रपतिपदासाठी सगळे विरोधक जर एकत्र येत असतील आणि सत्ताधारी पक्षातील काही प्रमुख नेत्यांना जर वाटत असेल की, देशाला डॉ. एपीजे अब्दुल कलाम, प्रणव मुखर्जी यांच्यासारखे एक उत्तम राष्ट्रपती मिळावा तर एकच नाव समोर येते ते म्हणजे शरद पवार, हे मोदीदेखील मान्य करतील.
तर आम्ही स्वागत करू
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या दीड वर्षात 10 लाख नोकऱ्या देण्याची घोषणा केली आहे. त्यावर बोलताना राऊत म्हणाले की, यापूर्वी मोदींनी दोन कोटी नोकऱ्या देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर भाजपने हा आकडा पाच कोटींवर नेला. त्यानंतर आज पुन्हा पंतप्रधान मोदींनी दहा लाख नोकऱ्या देण्याची घोषणा केली आहे. मोदींनी दिलेल्या शब्दावर कायम राहावे. जर दहा लाख जणांना नोकरी मिळत असेल तर त्यांच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करू.
पवारांची इच्छा नाही
पुढे राऊत म्हणाले की, माझी त्यांच्यासोबत चर्चा झाली त्यात मला त्यांची इच्छा राष्ट्रपती निवडणुकीबाबत दिसली नाही. मी त्यांना विचारले की, आपण इच्छुक आहात का? तेव्हा त्यांची इच्छा मला दिसली नाही. तरीही ते स्वत: उद्याच्या बैठकीत उपस्थित राहणार आहेत. त्यावर आधी चर्चा होईल त्यानंतरच उमेदवार ठरेल.
भाजपसमोर झुकायला तयार नाही
गेल्या आठ वर्षांपासून सुडाच्या राजकारणासाठी अशा प्रकारच्या घडामोडी घडत आहे. जे जे केंद्र सरकारच्या विरोधात आवाज उठवतात त्यांच्यावर कारवाई करण्यात येते. पण त्यांच्यासमोर कोणीही झुकायला तयार नाहीत ही या देशाची लोकशाही आहे, असे म्हणत राऊतांनी केंद्र सरकार हल्ला चढवला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.