आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराईडीच्या धाकाने किंवा अन्य काही आमिषाला बळी पडून काही आमदार पळाले असतील, विशेषत: जे स्वत:ला बछडे वाघ म्हणवून घ्यायचे तर ते म्हणजे पक्ष नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली. पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले की, आपण जो काल रस्त्यावर पाहिला तो पक्ष आहे. आणि हा पक्ष उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मजबूत आहे. चार आमदार आणि कुणी दोन खासदार किंवा दोन नगरसेवक गेला म्हणजे पक्ष गेला असे नाही होत. आणि हे का गेले सोडून याची कारणे लवकरच समोर येतील. तरीही त्यांच्याशी चर्चा सुरू आहे.
20 आमदार संपर्कात असल्याचा दावा
राऊत म्हणाले की, अजूनही 20 आमदार आमच्या संपर्कात आहेत. आम्हाला कसं बळजबरीनं नेलंय तिकडे, असं ते सांगत आहेत. आज आमच्या दोन आमदारांची पत्रकार परिषद आहे, नितीन देशमुख आणि कैलास देशमुख ते त्यांची संपूर्ण कथा सांगतील. अनेक आमदार हे भाजपच्या कब्जामध्ये आहे. मी भाजपचं नाव घेतोय कारण त्यांच्या कारणास्थानाशिवाय भाजपशासित राज्यात आमदारांना डांबून ठेवणं शक्य नाही.
मुख्यमंत्र्यांची बैठक रद्द
मुख्यमंत्री आज कोणतीही बैठक घेणार नसल्याचेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले. राऊत म्हणाले की, वर्षावर आमदार जातील, काही तांत्रिक गोष्टी पूर्ण करायच्या आहेत. त्यानंतर आमचे दोन आमदार कैलास पाटील आणि नितीन देशमुख हे पत्रकार परिषद घेतील.
त्यांच्यासोबत आमचे इतर प्रमुख लोकं असतील. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतरही आमदारांचे जाणे सुरूच असल्याच्या प्रश्नावर राऊत म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी आमदारांना कोणतंही आवाहन केलेलं नाही, या आमदारांनी पुन्हा निवडून येऊन दाखवावं असा इशाराही त्यांनी दिला.
पक्ष वेगळा आणि विधिमंडळ पक्ष वेगळा
राऊत म्हणाले की, आजही शिवसेना मजबूत आहे, पक्ष जमिनीवर आहे, हजारो लाखो कार्यकर्ते आजही आमच्यासोबत उभे आहेत. काही आमदार आम्हाला सोडून गेले म्हणजे पक्ष संपला असे नाही, पक्ष हा वेगळा आहे आणि विधिमंडळ पक्ष वेगळा आहे. कोणत्या परिस्थितीत, कोणत्या दबावात हे लोकं आम्हाला सोडून गेले याचा खुलासा लवकरच होईल. उद्धवजींनी काल नक्कीच आवाहन केलं असेल की परत या आणि बोला. पुढे ते म्हणाले की, आमच्या संपर्कात जवळपास 20 आमदार आहेत. ते मुंबईत आल्यावर कळेलच. जे संकट आहे त्याच्याशी सामना कसा करायचा याचा पूर्ण अनुभव आम्हाला आहे, असेही ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, अनेक वर्षांपासून आम्ही बाळासाहेबांसोबत उद्धजींसोबत काम केले आहे. फक्त बाळासाहेबांचे भक्त म्हणून भागत नाही, जो ईडीच्या दबावाला घाबरून पळतो तो भक्त असू शकत नाही. आम्ही खरे भक्त आहोत. आमच्यावरही दबाव आहे. आमचा एक मंत्री चार दिवसांपासून सलग ईडीच्या ऑफिसमध्ये जाऊन बसतोय, त्यांनी पक्ष नाही सोडला. आम्ही अखेरच्या श्वासापर्यंत पक्ष सोडणार नाही. फ्लोअर टेस्टवर काही परिणाम होईल का, या प्रश्नावर ते म्हणाले की, फ्लोअर टेस्ट जेव्हा होईल तेव्हा सगळं स्पष्ट होईल.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.