आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजय राऊतांचा सरकारला सल्ला:'सरकारमधील प्रत्येक घटकाने आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे, मंत्र्यांनी आपले पाय जमिनीवर आहेत का हे तपासून घ्यावे'

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • या सर्व प्रकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे योग्य भूमिका घेऊन निर्णय देतील - राऊत

अँटिलिया प्रकरण समोर येताच राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. आता तर माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना गृहमंत्री अनिल देशमुखांवर गंभीर आरोप करत पत्र पाठवल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर थेट प्रश्न उपस्थित होत आहे. या सर्वांवर आता हे सरकार स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका असणाऱ्या शिवसेना खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकारमधील प्रत्येक घटकाने आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली असल्याचे राऊत म्हणाले आहेत.

संजय राऊतांनी रविवारी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, 'सचिन वाझे प्रकरण आणि परमबीर सिंह यांच्या पत्रामुळे राज्य सरकारवर शिंतोड उडाले आहेत. त्यामुळे आता सरकारमधील मंत्र्यांनी आपले पाय जमिनीवर आहेत का, ते तपासून पाहायला हवे. सरकारमधील प्रत्येक घटकाने आत्मपरीक्षण करण्याची वेळ आता आलेली आहे. पोलिस खाते हे राज्याचा कणा असतो. स्वाभिमानाचे प्रतिक असते. हा कणा राज्यकर्त्यांनी मजबूत ठेवायचा असतो. सध्याची परिस्थिती पाहता काहीतरी दुरुस्त करावे लागेल'

...सत्तेपुढे शहाणपण चालत नाही
पुढे बोलताना राऊत म्हणाले आहेत की, 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कायम सरकारची प्रतिमा चांगली ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मात्र, काही अधिकाऱ्यांच्या माध्यमातून या गोष्टी घडत आहेत. या सर्वांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे होते. पण सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. जगभरात सत्तास्थानी बसल्यावर अनेकांना आपणच शहाणे असल्यासारखे वाटायला लागते, हे या प्रकरणाच्या निमित्ताने दिसून आले'

शरद पवार योग्य निर्णय घेतली
संजय राऊत आज दिल्लीमध्ये जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. येथे जाऊन ते शरद पवारांची भेट घेणार आहेत. या सर्व प्रकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे योग्य भूमिका घेऊन निर्णय देतील असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला आहे. दिल्लीत गेल्यावर पवारांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

परमबीर सिंहांच्या पत्रातील सत्यता पडताळावी
परमबीर सिंहांनी मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांवर खळबळजनक आरोप करत पत्र पाठवले आहे. या पत्रावरही संजय राऊतांनी भाष्य केले आहे. राऊत म्हणाले की, परमबीर हे एक उत्तम अधिकारी आहेत. त्यांना आतापर्यंत चांगली सेवा बजावली आहे. त्यांनी पत्रामध्ये ज्या गोष्टी लिहिल्या आहेत, त्याची पडताळणी केली जाईल. गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही अशीच मागणी केली आहे. आता मुख्यमंत्री याची सत्यता पडताळून पाहतील असेही राऊत म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...