आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राऊत यांचा दावा:जयंत पाटील, वळसेंनी नकार दिल्याने देशमुख झाले गृहमंत्री, त्यांनी वाझेचे महत्त्व वाढवल्यामुळे महाराष्ट्राची बदनामी

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पोलिस खात्याचे नेतृत्व फक्त ‘सॅल्यूट’ घेण्यासाठी नसते

जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील यांनी गृहमंत्रिपद स्वीकारण्यास नकार दिला. तेव्हा हे पद शरद पवार यांनी अनिल देशमुख यांच्याकडे दिले, असा गाैप्यस्फोट करत देशमुख हे तर अॅक्सिडेंटल होम मिनिस्टर असल्याचा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. सचिन वाझे हा साधा फौजदार. त्याचे महत्त्व वाढवल्यामुळे महाराष्ट्राच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिल्याप्रकरणी राऊत यांनी अनिल देशमुख यांनाच जबाबदार धरले आहे. शिवसेनेच्या मुखपत्रात राऊत यांनी हे रोखठोक मत मांडले आहे. या स्तंभात राऊत यांनी थेट गृहमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्यावर जोरदार ताशेरे ओढले.

राऊत लिहितात, मनसुख हिरेन व अँटिलिया स्फोटक प्रकरणात राज्य सरकारने मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांची बदली केली. होमगार्ड महासंचालक पदावरील बदली ते सहन करू शकले नाहीत. त्यांच्या अस्वस्थतेत तेल ओतले ते गृहमंत्री देशमुखांनी. पोलिस आयुक्तांनी चुका केल्या, त्यामुळे त्यांना जावे लागले असे विधान देशमुखांनी करताच परमबीरसिंग यांनी १०० कोटींच्या वसुलीचे टार्गेट गृहमंत्र्यांनी कसे दिले होते, अशा पत्राचा स्फोट केल्याचे दावा संजय राऊत यांनी आपल्या लेखातून केला आहे.

कुणी मिठाचा खडा टाकू नये : अजित पवार : उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार हे तीन पक्षांचे आहे. शिवसेनेत कुणाला मंत्रिपद द्यायचे याचा निर्णय उद्धव ठाकरे घेत असतात. काँग्रेसमध्ये कुणाला मंत्रिपद द्यायचे याचा अधिकार हा सोनिया गांधी यांना आहे आणि राष्ट्रवादीमध्ये कुणाला मंत्रिपद द्यायचे हे शरद पवार ठरवतात. त्यामुळे कुणी मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नये, असा टोला पवारांनी संजय राऊतांना लगावला.

पोलिस खात्याचे नेतृत्व फक्त ‘सॅल्यूट’ घेण्यासाठी नसते
गृहमंत्री या पदाची एक प्रतिष्ठा आहे. संशयास्पद व्यक्तीच्या कोंडाळ्यात राहून गृहमंत्री पदावरील कोणत्याही व्यक्तीस काम करता येत नाही. पोलिस खाते आधीच बदनाम. त्यात अशा गोष्टींमुळे संशय वाढतो, अशा कानपिचक्या राऊत यांनी गृहमंत्र्यांना दिल्या आहेत. अनिल देशमुख यांनी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी कारण नसताना पंगा घेतला. गृहमंत्र्याने कमीत कमी बोलावे. ऊठसूट कॅमेऱ्यासमोर जाणे व चौकशांचे जाहीर आदेश देणे बरे नाही. पोलिस खात्याचे नेतृत्व फक्त ‘सॅल्यूट’ घेण्यासाठी नसते. ते कणखर नेतृत्व देण्यासाठी असते. हा कणखरपणा प्रामाणिकपणातून निर्माण होतो, या शब्दांत संजय राऊत यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे कान टोचले आहेत.

बातम्या आणखी आहेत...