आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्राचाळ प्रकरणी ईडीचा दावा:प्रवीण यांच्या आडून संजय राऊतांचा घोटाळा, 4 ऑगस्टपर्यंत कोठडी; घरचे जेवण, औषधीस मुभा

मुंबई12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरू आशिष कन्स्ट्रक्शन प्रा. लिमिटेडचे संचालक प्रवीण राऊत यांच्या आडून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्राचाळ घोटाळा केल्याचे सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) विशेष पीएमएलए कोर्टात सोमवारी सांगितले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने संजय राऊत यांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली. दरम्यान, राऊत यांना घरचे जेवण, औषधी घेण्याची मुभा तसेच रात्री दहानंतर चौकशी करू नये, असेही कोर्टाने सांगितले.

पत्राचाळ घोटाळाप्रकरणी सोमवारी विशेष न्यायालयात सुनावणी झाली. या वेळी ईडीचे वकील हितेन वेनेगावकर यांनी कोर्टात सांगितले की, गुरू आशिष कन्स्ट्रक्शन प्रा. लिमिटेडचे संचालक प्रवीण राऊत यांनी एक पैसाही या प्रकल्पात गुंतवला नाही. मात्र, त्यांच्या खात्यात ११२ कोटी रुपये आले. याचा फायदा राऊत यांनाही झाला. संजय राऊत आणि त्यांच्या पत्नी वर्षा यांच्या खात्यात.

१ कोटी ६० लाख रुपयांचे हस्तांतर झाले. याच पैशांतून राऊत यांनी अलिबागच्या किहीम बीचवर एक प्लॉट घेतला, तर स्वप्ना पाटकर यांच्या नावावर एक प्लॉट घेण्यात आला. प्रवीण राऊत यांच्या आडून संजय राऊत यांनी घोटाळा केल्याचे निदर्शनास येत आहे. स्वप्ना पाटकर आणि प्लॉट मालक यांनीही पैसे मिळाल्याचे सांगितले आहे. प्रवीण राऊत हा संजय राऊत यांचा जवळचा व्यक्ती आहे. त्यानेच म्हाडा आणि इतर याेजनांत राऊत यांना फायदा मिळवून दिल्याचे ईडीने सांगितले. अशोक मुंदरगी यांनी संजय राऊत यांच्याकडून युक्तिवाद केला. राऊत यांनी न्यायालयात जाताना मला आणि पक्षाला संपवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला. पत्राचाळ विकसीत करण्याचे कंत्रात मिळालेल्या गुरूआशिष कन्स्ट्रक्शन प्रा.लि.ची स्थापना १ जून २००० रोजी झाली.

गेल्या २२ वर्षात कंपनीचे ७ संचालक बदलले. २००७ मध्ये प्रविण राऊतही याचे संचालक झाले. १८ नोव्हेेंबर २०१३ ला त्यांनी या संचालक पदाचा राजीनामा दिला. हेच प्रविण राऊत सध्या साईसीद लैंड डेव्हलपर्स प्रा.लि., प्रथमेश डेव्हलपर्स एलएलपी आणि माओमी डेअरी प्रॉडक्ट्स एलएलपीचे संचालक आहेत. तर गुरू आशिष कन्स्ट्रक्शनसह ८ कंपन्यांचे माजी संचालक आहेत. - गुरु आशिषचे संचालक राकेश आणि सारंग वाधवान यांना ३ ऑक्टोबर २०१९ रोजी पीएमसी बँक घोटाळ्यात आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली होती. त्यानंतर प्रविण राऊतला पत्राचाळ प्रकरणात ईडीने फेब्रवारी २०२२ रोजी अटक केली. - त्याआधी ईडीने याच पीएमसी बँक घोटाळ्यात २८ डिसेंबर २०२० रोजी वर्षा राऊतला नोटीस दिली, ५ एप्रिल २०२२ ला संपत्ती जप्त केली व ६ जानेवारी २०२१ ला चौकशी केली होती.

पत्राचाळीच्या ‘एफएसआय’चा घोटाळा
विकलेल्या १०३४ कोटींच्या एफएसआयचा हिशोब संजय राऊतांना द्यावा लागणार आहे.
- प्रवीण राऊत, गुरू आशिषचे माजी संचालक
- पत्राचाळ : 2006 मध्ये म्हाडा, गुरू आशिष बिल्डर आिण भाडेकरूंमध्ये करार झाला.
- गुरू आशिष : २००७ मध्ये प्रवीण राऊत गुरू आशिषचा संचालक
- प्रवीण राऊत : 1034 कोटींच्या एफएसआयच्या बेकायदा विक्रीचा ईडीकडून ठपका. आता कंपनीचा संचालक म्हणून प्रवीण राऊत सध्या ईडीच्या कोठडीमध्ये आहे.
- माधुरी राऊत : प्रवीण राऊत यांची पत्नी - वर्षा राऊत : संजय राऊत यांची पत्नी (या दोघी सिद्धांत सिस्कॉन प्रा.लि कंपनीत भागीदार)
- संजय राऊत : प्रवीण राऊतांकडून वर्षा राऊतांच्या खात्यावर १ कोटी ६० लाख जमा झाल्याचा ईडीचा आरोप. यातून अलिबागमध्ये प्लॉट घेतल्याचा दावा केला आहे.
- ईडी : प्रवीण हा संजय राऊतांचा ‘फ्रंटमॅन’ असल्याचा आरोप करत १०३४ कोटींच्या घोटाळ्याचा त्यांच्यावर ईडीकडून ठपका.

पत्राचाळीच्या ‘एफएसआय’चा घोटाळा : सिद्धार्थनगरात ४७ एकरांवरील पत्राचाळीच्या विकसनासाठी म्हाडाने २००६ मध्ये राकेश व सारंग वाधवान यांच्या गुरू आशिष कंपनीशी करार केला. २० मार्च २००७ रोजी प्रवीण राऊत कंपनीचा तिसरा संचालक बनला. २००८ पर्यंत घरे न दिल्याने भाडेकरूंची म्हाडाकडे तक्रार. २०१६ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीसांनी तपासाचे आदेश दिले. २०१६ मध्ये कंपनीविरोधात गुन्हा दाखल झाला. गुरू आशिषने १०३४ कोटींचा एफएसआय अन्य बिल्डर्सना अवैधपणे विकल्याचे पुढे आले. संचालक म्हणून प्रवीण राऊत ईडीच्या कोठडीत. प्रवीणने संजय राऊतच्या पत्नी वर्षा यांना घर खरेदीसाठी दिलेले ५५ लाख का व कशासाठी दिले, ते कोठून आले या प्रश्नापासून सुरू झालेला हा तपास आता १०३४ कोटींवर आला आहे.

मनी ट्रेल : प्रवीण राऊत ते संजय राऊत, व्हाया वर्षा व माधुरी राऊत

संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांच्यातील आर्थिक संबंध नसले तरी दोघांच्या पत्नींच्या माध्यमातून हे चक्र पूर्ण झाले आहे. संजय यांच्या पत्नी वर्षा राऊत आणि प्रवीण यांच्या पत्नी माधुरी या सिद्धांत सिस्कॉन प्रा.लि. या कंपनीमध्ये भागीदार आहेत.

पत्राचाळ हा प्रत्यक्षात एफएसआय घोटाळा आहे. म्हाडाच्या जमिनीचे विकसनाचे हक्क बिल्डर्सना बेकायदा विकल्याचा व प्रवीण राऊतआडून संजय राऊतच काम करीत असल्याचा ईडीचा आरोप आहे. वर्षा राऊतांना फ्लॅटसाठी प्रवीणने का व कशाच्या बदल्यात १.६० कोटी रुपये दिले येथपासून सुरू झालेला हा तपासाचा धागा पत्राचाळ घोटाळ्यातील १,०३४ कोटींपर्यंत पोहोचला आहे.

ईडीचा युक्तिवाद असा

संजय राऊत यांनी गुन्हेगारीच्या उत्पन्नातून संपत्ती खरेदी केली. संजय राऊतांच्या परदेश दौऱ्यासाठी प्रवीण राऊत याच्याकडून पैसा देण्यात आल्याचे ईडीने या वेळी न्यायालयामध्ये सांगितले.​

राऊतांच्या वकिलांची बाजू

संजय राऊत यांच्यावर राजकीय हेतूने कारवाई होत आहे. काही प्रश्नांची उत्तरे देता येत नसतील तर तो गुन्हा नाही. राऊत राजकीय नेते आहेत. ते दिल्लीतील अधिवेशनात होते, ईडी चौकशीला गैरहजर होते.

बातम्या आणखी आहेत...