आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हिंदू वोट बँकविषयी मंगळवारी विधान केले होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू वोट बँक तयार केली आणि अटल बिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदींनी त्यावर कळस चढवला असल्याचे चंद्रकांत पाटली म्हणाले होते. आता पाटलांच्या या वक्तव्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. अयोध्येत बाबरीचे पतन होत असताना सध्याचे हिंदू वोट बँकवाले पळून गेले असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे.
संजय राऊत यावेळी बोलताना म्हणाले की, 'चंद्रकांत पाटील काय म्हणतात यावरुन भूमिका ठरत नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू व्होट बँक तयार केली का हे माहिती नाही, मात्र त्यांनी या देशातील सर्वात पहिले हिंदवी स्वराज्य स्थापन केले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचाच विचार हिंदूह्रदयम्राट बाळासाहेब ठाकरे आणि त्यापूर्वी वीर सावकर यांनी महाराष्ट्रात आणि देशभरात रुजवला आहे. तसेच बाळासाहेब ठाकरेंनी हिंदूना हिंदू म्हणून मतदान करण्यास भाग पाडले. या देशामध्येहिंदूची वोट बँक आहे हा विचार बाळासाहेब ठाकरे यांनी मांडला आहे. अयोध्येत बाबरीचे पतन होत असताना सध्याचे हिंदू वोट बँकवाले पळून गेले आणि शिवसेना, शिवसेनाप्रमुख ठाम उभे राहिले.' असे देखील राऊत म्हणाले आहेत.
बाळासाहेब ठाकरेंच्या नावावर असलेली हा पानं कधीच कोणाला फाडता येणार नाही
पुढे बोलताना राऊत म्हणाले की, 'बाबरी पाडणाऱ्या शिवसैनिकांचा आम्हाला गर्व आहे. हा त्याचा एक भाग होता. आमचं हिंदुत्व हे पळपूटे आणि शेपूट घालणारे नाही. आम्ही ठामपणे उभे राहतो, लढतो आणि विजय देखील मिळवतो. फक्त राजकारणासाठी, निवडणुकांच्या सोयीसाठी, मंदिरांसाठी आमचे हिंदुत्व नाही. लोकांना अन्न, वस्त्र, निवारा, रोजगार यासंदर्भात हे हिंदुत्त्व आहे. वोट बँकेचे राजकारण ज्यांना करायचे आहे त्यांना करु द्यावे मात्र इतिहासाची पानं पुन्हा एकदा चाळायला हवी. बाळासाहेब ठाकरेंच्या नावावर असलेली ही पानं कधीच कोणाला फाडता येणार नाही आणि आणि पुसता देखील येणार नाही'
काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?
पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले होते की, 'तिकीट पक्षाचे असते त्यामुळे माझे तिकीट कापले हा शब्दप्रयोग करणेच चुक आहे. कोणतेही तिकीट हे पक्षाचे असते. वोट बँक देखील पक्षाची असते. तुमचे काम पाहून पक्षाकडून तुम्हाला उमेदवारी दिली जात असते. वोट बँक ही वर्षानुवर्षे मेहनत घेऊन तयार केलेली असते. ही व्होट बँक संत, मंहतांपर्यंत, छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचते. त्यांनी ही हिंदुत्वाची व्होट बँक विकसित केलेली आहे. अलीकडच्या काळात अटल बिहारी वाजपेयी, आडवाणी, नरेंद्र मोदी आणि सर्वांनी त्यावर कळस चढवलेला आहे. ती व्होट बँक तुम्हाला मिळते, त्यासाठी तुमचा चेहरा, गाव थोडसंच उपयोगी पडते. अन्यथा ते तिकीटही, उमेदवारही आणि वोट बँकही पक्षाची आहे' असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.