आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंजय राऊतांना खोट्या केसेसमध्ये पुन्हा अटक होऊ शकते. त्यांना गोवण्याचा प्रयत्न होऊ शकतो, असा आरोप आज शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. तसेच, तपास यंत्रणांचा वापर केंद्र सरकार पाळीव प्राण्यांप्रमाणे करत आहे, अशी घणाघाती टीकाही राऊतांनी केली.
तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मातोश्रीवर जात आज उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे, संजय राऊत, आदित्य ठाकरे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.
तपास यंत्रणा बंद का करू नये?
उद्धव ठाकरे म्हणाले, केंद्रीय तपास यंत्रणा सुपारी घेतल्याप्रमाणे काम करत आहे. केंद्र सरकारच्या पाळीव प्राण्याप्रमाणे त्यांचा वापर होत आहे. केंद्र सरकार म्हणेल त्यांच्या अंगावर या यंत्रणांना बेकायदेशीरपणे सोडले जात आहे. देशात अशी उदाहरणे आपण रोजच पाहत आहोत. अशा यंत्रणांना केंद्र सरकारच्या यंत्रणा म्हणता येणार नाही. अशा यंत्रणा कायमच्या बंद का करु नये, असा प्रश्न आता पडत आहे.
न्यायव्यस्था अंकित करण्याचा प्रयत्न
उद्धव ठाकरे म्हणाले, केंद्र सरकारकडून न्यायव्यवस्थाही अंकित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनीच न्यायव्यवस्थेवर केंद्राचे काही नियंत्रण हवे, असे वक्तव्य केले आहे. सध्या देशात न्यायालये हे सामान्यांचे एकमेव आशास्थान असताना त्यांनाच आता बुडाखाली घेण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. सर्व जनतेने याला विरोध केला पाहिजे.
देशभरात विरोधकांचा छळ
उद्धव ठाकरे म्हणाले, केंद्र सरकारने तपास यंत्रणांचा गैरवापर करून अनेक पक्ष फोडले. विरोधकांवर खोट्या केसेस लादल्या. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर तेलंगणामध्ये केसीआर यांना, आप पक्षाला, झारखंडमध्ये सोरेन यांना व पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना छळले जात आहे. हे सर्व पक्ष एकत्र आले तर किती मोठी ताकद निर्माण होईल, याची कल्पना केंद्र सरकारला नाही.
न्यायालयाचा निकाल चांगले संकेत
उद्धव ठाकरे म्हणाले, संजय राऊत केवळ शिवसेना नेते, खासदार नाहीत. ते माझे जिवलग मित्र आहेत. आपल्यावर संकट येऊनही जो डगमगत नाही, तोच खरा मित्र. संजय राऊत तसे मित्र आहेत. केवळ मित्र नव्हे तर ते एका लांब पल्ल्याची तोफ आहेत. तसेच, न्यायव्यवस्थेने जो निकाल दिला, तपास यंत्रणेबद्दल जे परखड निरीक्षण नोंदवले, त्याबाबतही मी न्यायालयाचे आभार मानतो. न्यायालय निष्पक्षपणे न्याय देतात, हे या निकालाने अधोरेखित केले आहे. संपुर्ण देशासाठी हे एक चांगले चित्र आहे.
ठाकरेंमुळे मी निश्चिंत
यावेळी संजय राऊत म्हणाले, तुरुंगात गेल्यानंतरही ठाकरे व शिवसेनेचे कुटुंब माझ्या परिवाराची काळजी घेईल, याची खात्री मला होती. त्यामुळेच मी निश्चिंत होतो. शिवसेनेसाठी दहावेळेस तुरुंगात पाठवले तरी जाण्यास मी तयार आहे.
म्हणून फडणवीसांना भेटणार
संजय राऊत यांनी सांगितले की, तुरुंगात असताना मला तेथील अनेक समस्या, कर्मचाऱ्यांच्या अडचणी समजून घेता आल्या. राज्याचे गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांसमोर मी या सर्व समस्या मांडणार आहे. त्यासाठी त्यांची भेट घेणार आहे, याच चुकीचे काय. तसेच, तुरुंगात मी दोन पुस्तकांचे काम केले आहे. लवकरच ते सर्वांसमोर मांडणार आहे, अशी माहितीही राऊतांनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.