आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरीवर झाला, हे महाराष्ट्रातील पोरासोरांना माहिती आहे. मात्र, भाजपने शिवनेरीवर फुली मारली. शिवनेरीचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केला. छत्रपतींचा जन्म महाराष्ट्रात झाला, हे तरी भाजपला मान्य आहे का?, असा हल्लाबोल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर केला.
आज पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, भाजपला नेमका कोणता इतिहास लिहायचा आहे? छत्रपती शिवाजी महाराज या नावाचा एक युगपुरुष जन्माला आला, हे तरी भाजपला मान्य आहे का? इतिहासासोबत ही गद्दारी महाराष्ट्र सहन करणार नाही.
राज्यपालांना कारे करा
संजय राऊत म्हणाले, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार हे सीमाभागात जाऊन कर्नाटक सरकारला कारे करू, असे बोलत आहेत. मात्र, आधी त्यांनी राजभवनात जाऊन राज्यपालांना कारे करावे. राजभवनात जाऊन राज्यापालांची चहा, बिस्कीट न घेता शिवरायांच्या अवमानाबाबत आधी शेलारांनी त्यांना जाब विचारावा. मात्र ते नेभळट आहेत. त्यांच्या मनगटात तेवढी हिंमत नाही. शिवरायांचा इतिहास तुडवला जात असताना, शिवरायांचा अवमान होत असताना ते शांत आहेत. ते काय कर्नाटकात जाऊन कारे करतील.आधी राज्यात शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना कारे करा.
बोम्मईंविरोधात बोंब मारा
संजय राऊत म्हणाले, सीमाप्रश्नी महाराष्ट्र सरकारने नेमलेले दोन मंत्री चंद्रकांत पाटील व शंभूराज देसाई यांनी आपला सीमाभागातील दौरा पुढे ढकलला आहे. या दोन मंत्र्यांनी किमान सीमा रेषेला टच तरी करून यावे. मात्र, त्यांच्यात तेवढी हिंमत नाही. उलट आम्हाला ते शिव्या घालताय. त्यांनी उलट कर्नाटक मुख्यमंत्री बोम्मईंच्या नावाने बोंब मारायला हवी. मात्र, हे हतबल, लाचार लोक आहेत. तुम्ही मंत्री आहात. तुम्हाला घटनात्मक दर्जा आहे. संरक्षण आहे. तुम्ही सीमाभागातील नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतलेच पाहीजे. मात्र, सीमावादात या सरकारने मिळमिळीत धोरण दिसत आहे. भाजपचे कर्नाटक मुख्यमंत्री बोम्मई यांच्याविरोधात ते भूमिका घेऊ शकत नाही. वेळ आली की हे सरकार हातभर शेपटी आत घालते.
गुजरातमध्ये प्रचार का करावा लागतो?
गुजरात विधानसभा निवडणुकीवरूनही संजय राऊत यांनी भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले. संजय राऊत म्हणाले, नरेंद्र मोदी हे गुजरातचे तीन वेळेस मुख्यमंत्री राहिले आहेत. पंतप्रधान म्हणूनही त्यांनी आपला अधिकांश वेळ गुजरातलाच दिला आहे. तरीदेखील गुजरात निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमध्येच तळ ठोकून आहेत. प्रचारासाठी आपली पूर्ण ताकद पणाला लावत आहेत. याशिवाय भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री अमित शहा, सर्व केंद्रीय यंत्रणाही त्यांनी प्रचारासाठी लावल्या आहेत. मुळात प्रचाराविना गुजरात निवडणूक भाजपने जिंकायला हवी.
भाजपवर जनतेचा रोष
संजय राऊत म्हणाले, यावरून गुजरातच्या जनतेत भाजपचे काय स्थान आहे, हे दिसून येते. जनता भाजपवर नाराज असल्याची दिसते. त्यामुळे निकाल काय लागतील हे सांगू शकत नाही. तसेच, गुजरातमध्ये काँग्रेसचे अस्तित्वच नाही, असे भाजप म्हणते. दुसरीकडे, निवडणुकीत काँग्रेसलाच टार्गेट करते. मुळात तेथील जनतेचे प्रश्न वेगळे आहेत. त्यावर भाजप काहीही बोलताना दिसत नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.