आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना फडतूस गृहमंत्री म्हटल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनीही मी फडतूस नव्हे तर काडतूस, असे प्रत्युत्तर दिले होते. त्यावर ईडी व सीबीआय हेच तुमचे खरे काडतूस आहेत. एकदा त्यांना बाजूला करा मग काडतूस कुठे घुसते हे दाखवतो, अशा शब्दांत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पलटवार केला आहे.
उद्धव ठाकरेंनी काल देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहरी टीका केल्यानंतर फडणवीसांसह भाजप नेत्यांनीही उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली. त्याला आज पत्रकार परिषदेत संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिले.
फडतूस हा शब्द सौम्यच
संजय राऊत म्हणाले, उद्धव सेनेच्या रोशनी शिंदे या पदाधिकाऱ्यावर शिंदेंच्या टोळीतील गुंडांनी हल्ला केला. ती मातृत्वाचे उपचार घेत असूनही तिच्या पोटावर लाथा मारण्यात आल्या. तिच्यावर हल्ला करण्याचे कारणच काय होते? याप्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतरही पोलिस केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत. अशा सरकारलाच सर्वोच्च न्यायालयाने नपुंसक म्हटले होते.
पुढे संजय राऊत म्हणाले, या सर्व प्रकरणावर टीका करताना खरे तर उद्धव ठाकरेंनी सौम्य शब्द वापरला. फडतूसचा डिक्शनरीत अर्थ पाहिला तर तो मिनिंगलेस, बिनकामाचा असा आहे. त्यामुळे तो शब्द एवढा आत घुसण्याचे कारण नव्हते. कदाचित नागपुरात फडतूसचा अर्थ वेगळा असेल. फडणवीस म्हणतात मी नागपुरातील आहे. मला याहून खालच्या पातळीवर बोलता येते. पण, नागपूरही महाराष्ट्रातच आहे ना. तिथली सर्व भाषा आम्हाला कळते.
महाराष्ट्राला फडणवीसांची अडचण
संजय राऊत म्हणाले, देवेंद्र फडणवीस म्हणतात मी फडतूस नव्हे तर काडतूस आहे. खरे तर सीबीआय, ईडी हेच यांचे काडतूस आहे. ईडी, सीबीआयमुळेच यांना चरबी चढलील आहे. ते एकदा बाजुला करा मग काडतूस कुठे घुसते हे दाखवतो.
संजय राऊत म्हणाले, देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत, हीच महाराष्ट्राची अडचण झाली आहे. तुमच्या डोळ्यांसमोर म्हणजेच मंत्रालयासमोर तिघांनी आत्महत्या केल्या. तरीही फडणवीसांना याविषयी कल्पना नाही. हीच का तुमची मर्दानगी. याला कोणता कारभार म्हणायचा. आम्ही तसेही फाटके आहोत. तुमच्या ईडी, सीबीआयला आम्ही घाबरत नाही. मात्र, असे राजकारण करुन भाजपनेच महाराष्ट्राची परंपरा मोडून काढली आहे.
बावनकुळेंचे तिकीट का कापले होते?
दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तर उद्धव ठाकरेंना धमकीच दिली आहे. भाजप नेत्यांविषयी यापुढे खालच्या भाषेत टीका केल्यास ठाकरेंना यापुढे घराबाहेरही पडू देणार नाही, असे बावनकुळे यांनी म्हटले आह. त्यावर संजय राऊत म्हणाले, बावनकुळे आहेत कोण? 2019च्या विधानसभा निवडणुकीत बावनकुळेंचे तिकीट का कापले होते?, हेच एकदा त्यांना विचारा. दिल्लीतील भाजप नेत्यांनी तेव्हा त्यांना घराबाहेरही पडू दिले नव्हते. त्यांच्या पत्नीलाही तेव्हा तिकीट दिले नव्हते.
बावनकुळेंचा वीज खात्यात मोठा भ्रष्टाचार
संजय राऊत म्हणाले, चंद्रशेखर बावनकुळे यांनी वीज खात्यात मोठा भ्रष्टाचार केला होता. भ्रष्टाचाराचे हे प्रकरण दिल्लीत गेल्यामुळेच त्यांचे तिकीट कापण्यात आले होते. आम्ही मर्यादा सांभाळलीये. त्यामुळे तुम्ही शिवसेनेला धमक्या देऊ नका. स्वत:लाच सांभाळा. ईडी, सीबीआयमुळेच तुमची जीभ चुरुचुरु चालत आहे. तुमच्यासारखे फुसके बार खूप पाहिले आहेत. ईडी, सीबीआयमुळे हे पोपट आता मिठू-मिठू बोलू लागले आहेत.
हेही वाचा,
कुठे नेऊन ठेवलंय राजकारण!:ठाण्यात युवा सेनेच्या तरुणीला शिंदे गटाकडून मारहाण, नेत्यांची खालच्या भाषेत टीका, राजकारण तापले
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात सोशल मीडियावर पोस्ट टाकल्याच्या रागातून शिंदे गटाच्या महिलांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप उद्धव सेनेच्या रोशनी शिंदे या महिलेने केला. सोमवारी सायंकाळी ठाण्यातील कासार वडवली भागात झालेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या रोशनीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकारानंतर ठाण्यात राजकारण चांगलेच तापले. उद्धव ठाकरे यांनी तिची भेट घेतल्यानंतर शिंदे - फडणवीस यांच्यावर अत्यंत खालच्या भाषेत टीका केली. मग देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंना त्याच भाषेत प्रत्युत्तर दिले. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तर उद्धव ठाकरेंना उघड धमकीच दिली. या नेत्यांच्या अत्यंत गलिच्छ वक्तव्ये, वर्तनामुळे महाराष्ट्राची मान शरमेने झुकली. मुख्यमंत्री शिंदे यांनी मात्र उशिरापर्यंत प्रतिक्रिया दिली नव्हती. तर बुधवारी उद्धव सेना या हल्ल्याविरोधात ठाण्यात मोर्चा काढणार आहे. आदित्य ठाकरे त्याचे नेतृत्व करतील. वाचा सविस्तर
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.