आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राऊतांचे भाजपला आव्हान:गोवा निवडणुकीत भाजपच्या लोकांकडून पैशांचा पाऊस पाडला जातोय, तरीही हिंदुत्ववादी या नोटांना पुरुन उरेल; कितीही नोटा टाका, आम्ही लढूच!

मुंबई10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोव्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. भाजपच्या लोकांकडून गोव्यात नोटांचा पाऊस पाडला जात आहे. महाराष्ट्रातून नोटांच्या बॅगाच्या-बॅगा भरून गोव्यात पाठवल्या जात आहेत असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गोव्याच्या निवडणुकीवरून एक विधान केले होते. त्यावरच शिवसेना खासदारांनी उत्तर दिले आहे. उत्तर प्रदेशातही सत्तांतर अटळ आहे असे ते पुढे म्हणाले आहेत.

महाराष्ट्रात जनमत विकल्या गेला तसे आम्ही गोव्यात होऊ देणार नाही असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्याला उत्तर देताना संजय राऊत यांनी फडणवीस आणि भाजवर हल्लाबोल केला. राऊत म्हणाले, "देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातून गोव्यात गेले आहेत. त्या ठिकाणी गेल्यानंतर भारतीय जनता पक्ष फुटला हे आपण पाहिलेच असेल. कालच एका मंत्र्यांनी पक्षत्याग केला आणि भाजप आमदार प्रवीण झाटे यांनीही पक्ष सोडला. त्यामुळे, फडणवीसांनी आधी आपल्या पक्षात सुरू असलेले युद्ध पाहावे."

कितीही नोटा टाका, आम्ही लढू

शिवसेना खासदार पुढे बोलताना म्हणाले, "ते नोटांचा प्रश्न आहे असे म्हणत आहेत ते बरोबरच आहे. गोव्यात आमची लढाई नोटांशीच आहे. भाजपचे लोक निवडणुकीत पैशांचा पाऊस पाडत आहेत. त्यातही महाराष्ट्रातून नोटांच्या बॅगा गोव्यात चाललेल्या आहेत. अशात शिवसेनेसारखा पक्ष गोव्यात त्या नोटांशी नक्की लढेल. तसेच गोव्यातील जनतेला सांगण्याचा प्रयत्न करेल की या नोटांच्या दबावाखाली येऊ नका. शिवसेना हा सामान्यांचा, बहुजनांचा पक्ष आहे. हिंदुत्ववादी हा या नोटांना पुरुन उरेल हे नक्की. देवेंद्र फडणवीसांना माझा शब्द आहे, तुम्ही कितीही नोटा टाका, तुमच्या नोटांशी आम्ही लढू."

उत्तर प्रदेशात नक्कीच होणार सत्ता परिवर्तन

उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीवर सुद्धा शिवसेना खासदारांनी भाजपवर हल्लाबोल केला. "काही ओपिनिअन पोलमध्ये भाजप उत्तर प्रदेशात पुन्हा सत्तेवर येईल असे सांगितले जात आहे. आमच्या त्यांना शुभेच्छा. परंतु, सत्तेत येणाऱ्या पक्षांना कधी गळती लागत नाही. मंत्री, आमदार, प्रमुख कार्यकर्ते पक्ष सोडत नाहीत. त्यामुळे उत्तर प्रदेशचा प्रवास हा राजकीय परिवर्तनाच्या दिशेने सुरू आहे याची आम्हाला खात्री आहे." असे भाकित त्यांनी वर्तवले आहे.

देवेंद्र फडणवीसांसोबतच मुख्यमंत्री कधी घराबाहेर पडतील? असा सवाल विचारणाऱ्या चंद्रकांत पाटलांनाही संजय राऊतांनी उत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, "त्यांना योग्य वेळी माहिती देऊ. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे काम उत्तम सुरू आहे. येत्या 13 तारखेला पंतप्रधानांसोबत होणाऱ्या बैठकीत ते सहभागी होतील. शरद पवार यांच्याइतकी राजकारणाची, समाजकारणाची आणि व्यक्तिमत्वाची उंची आधी गाठा. तुमच्यासारखी जी टेकाडं आहेत, त्यांना सह्याद्री किंवा हिमालयाच्या उंचीशी स्पर्धा करता येणार नाही. पंतप्रधान पदावर एखादा माणूस बसला म्हणून तो मोठा होत नाही. पंडित नेहरु, इंदिरा गांधी, लालबहादूर शास्त्री यांची उंची मोठीच होती. अनेकदा अनेक व्यक्ती त्या पदावर पोहोचू शकल्या नाहीत तरी त्यांची उंची कमी होत नाही."

बातम्या आणखी आहेत...