आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने 'शटअप या कुणाल' या कार्यक्रमात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची विशेष मुलाखत घेतली. ही मुलाखत युट्यूबवर प्रसिद्ध झाली आहे. या मुलाखतीत संजय राऊत यांनी आपल्या शैलीत चौफेर फटकेबाजी केली. तसेच, सुशांत सिंह राजपूत, कंगना राणावत, अर्णब गोस्वामी प्रकरणावर आपले मत व्यक्त केले.
भाजपसोबत भावनिक नाते होते, पण..
भाजपची साथ सोडण्यावर राऊत म्हणाले की, 'भाजपसोबत आम्ही 25 वर्ष सत्तेत होतो. त्यांच्यासोबत एक भावनिक आणि जिव्हाळ्याचे नाते होते. एका विचाराने दोन्ही पक्ष एकत्र होते. 25 वर्षांच्या संसार मोडून दुसऱ्या पक्षासोबत जायचे म्हटल्यावर दु:ख तर होणारच आहे', असे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.
सुशांत मुंबईचाच मुलगा होता
सुशांत सिंह राजपूत प्रकरणावर बोलताना राऊत म्हणाले की, सुशांत सिंह राजपूतला मी बिहारचा मानत नाही. तो मुळात मुंबईचा होता. त्याला बिहारमध्ये कोण ओळखत होते. त्याला मुंबईने खरी ओळख दिली. तो मुंबईचा मुलगा होता, त्याला न्याय देणे ही आमची जबाबदारी आहे. मात्र, ओरडून सत्य लपणार नाही.
पुढे बोलताना ते म्हणाले की, सुशांत प्रकरणात मुंबई पोलिसांनी योग्य तपास केला होता. मुंबई पोलिस हे देशातील सर्वोत्कृष्ट पोलिस आहे. मुंबई पोलिसांनी केलेला तपास योग्य होता. पण त्यांच्यावर आरोप करण्यात आले. पोलिसांना माफिया म्हटले. हे अत्यंत चुकीचे होते. मुंबई पोलिस हे शहराचे रक्षण करताहेत हे लक्षात ठेवा, असा अप्रत्यक्ष टोलाही राऊत यांनी भाजप आणि कंगनाला लगावला.
म्हणून सामना अग्रलेखात उखाड दिया शीर्षक दिले
कंगना रनोटवर बोलताना राऊत म्हणाले की, अभिनेत्री कंगना रनोटने मी मुंबईत येत आहे, काय उखाड्याचे ते उखाडून घ्या, अशी धमकीच दिली होती. त्यामुळे मुंबई पालिकेने तिचे अनधिकृत बांधकाम तोडून फक्त तिची इच्छा पूर्ण केली होती, म्हणून सामनाच्या अग्रलेखात तसे शीर्षक देण्यात आले होते, असा टोलाही राऊत यांनी कंगनाला लगावला.
दलितांनी कधी तरी आरक्षण सोडले पाहिजे
मराठा आरक्षणाचा मुद्दा हा सुप्रीम कोर्टात न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे त्यावर भाष्य करणे हे योग्य ठरणार नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी आर्थिक परिस्थितीत पाहून आरक्षण द्यावे अशी भूमिका मांडली होती. जातीवर आरक्षण देऊ नये, असे त्यांनी जाहीर सभेत सांगितले होते. त्यामुळे आता परिस्थिती ही बदलेली आहे. जो मराठा समाजातील तरुण आहे, ज्याची परिस्थिती गरीब आहे, त्याला शिक्षण घेता येत नाही, त्याला आरक्षण मिळाले पाहिजे आणि अनेक वर्षांपासून दलित समाज आरक्षण घेत आला आहे, त्यांनी कधी तरी आरक्षण सोडले पाहिजे, असेही राऊत म्हणाले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.