आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रोखठोक संजय राऊत:सत्तास्थापनेपूर्वीच्या बैठकीत शरद पवार आणि काँग्रेस नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक, त्यामुळे पवार रागाने बैठकीतून निघून गेले होते; संजय राऊत यांचा गौप्यस्फोट

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'सामना'च्या रोखठोक सदरात संजय राऊत यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापनेचा घटनाक्रम मांडला
  • पवारांनी भाजपला शब्द दिला होता व त्यानुसार पहाटेच्या हालचाली झाल्या हे खोटेच आहे - संजय राऊत

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी स्थापन केलेल्या महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्ती निमित्ताने शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'तील रोखठोक सदरात पहिल्यांदाच संजय राऊत यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापनेचा घटनाक्रम मांडला आहे. तसेच महाविकासआघाडी सरकार स्थापनेच्या कार्यवाहीतील मोठे गौप्यस्फोट केले आहेत.

काय म्हटले रोखठोक सदरात?

'शरद पवार व माझ्यात 35 दिवस सुरू असलेल्या गाठीभेटी हा निव्वळ टाईमपास आहे असा अपप्रचार सुरू झाला. 17 नोव्हेंबरला सकाळी पत्रकारांनी मला विचारले, ‘‘तुमच्याकडे किती आमदारांचे पाठबळ आहे?’’ तेव्हा ‘‘आमचा आकडा 170 आहे’’ असे मी सांगितले. त्या 170 आकड्यांची खिल्ली उडवण्यात आली. तोपर्यंत सरकार स्थापनेसंदर्भात काँग्रेसचा स्पष्ट होकार आला नव्हता, पण अहमद पटेलांसारखे नेते सकारात्मक बोलत होते. मल्लिकार्जुन खरगे, पृथ्वीराज चव्हाण यांचे लक्ष सत्तेच्या वाटणीत राष्ट्रवादीला काय मिळत आहे यावरच होते. नेहरू सेंटरमधल्या 22 नोव्हेंबरच्या वाटाघाटीत मल्लिकार्जुन खरगे यांच्या एका वक्तव्याने ठिणगी पडली. विधानसभेचे अध्यक्षपद कोणाकडे? अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे जाता कामा नये अशी भूमिका खरगे वगैरे मंडळींनी घेतली. तेथे खरगे व शरद पवार यांच्यात शाब्दिक चकमक झाली. पवारांना इतके संतापलेले मी प्रथमच पाहिले. ते त्राग्याने टेबलावरचे कागद गोळा करून निघाले. त्यांच्या पाठोपाठ मी व प्रफुल्ल पटेल धावत गेलो. त्याच बैठकीत सुरुवातीला आघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार उद्धव ठाकरे असतील हे पवार यांनीच सुचवले, पण खरगे, पवार चकमकीने बैठकीचा नूर पालटला' असा महत्त्वाचा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला.

तर या घटनेनंतर 'अजित पवार हे बराच काळ त्यांच्या मोबाईल फोनवर खाली मान घालून ‘चॅटिंग’ करत होते. त्यानंतर तेही बैठकीतून बाहेर पडले. त्यानंतर अजित पवारांचा फोन ‘स्विच ऑफ’ झाला व दुसऱ्या दिवशी पहाटे त्यांचे दर्शन थेट राजभवनावरील शपथविधी सोहळ्यात झाले. फडणवीस-अजित पवारांचा शपथविधी सुरू असतानाच एक महत्त्वाचा फोन मला आला, ‘‘तुमचे सरकार बनत नाही. फडणवीस-अजित पवार शपथ घेत आहेत. अजित पवारांनी एनसीपी फोडली. पक्ष आणि कुटुंबात फूट पडल्याचे सुप्रिया सुळे यांनी सोशल माध्यमांवर मान्य केले आहे.’’ मी त्याक्षणीही सांगितले, ‘‘चार वाजेपर्यंत थांबा. अजित पवारांसोबत गेलेले परत येतील. स्वतः अजितदादाही गुदमरून परत फिरतील.’’ हे यासाठीच सांगायचे की, पहाटेच्या शपथविधीपूर्वी शरद पवार, अमित शहा यांच्यात दिल्लीत बैठक झाली अशा प्रकारच्या गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस अशी बैठक झाली व त्यात पहाटेच्या शपथविधीचे ‘नाटय़’ तयार झाले हे सर्वस्वी चूक आहे' असेही राऊत म्हणाले.

'अमित शहा यांच्या घरी एक बैठक झाली. त्यात एक बडे उद्योगपती व राष्ट्रवादीचे नेते असावेत. पवार या काळात दिल्लीत असताना त्यांच्यात व माझ्यात उत्तम संवाद होता व जवळ जवळ रोजच आम्ही भेटत होतो. नक्की कोठे काय सुरू आहे याचे ‘अपडेटस्’ एकमेकांना देत होतो. भारतीय जनता पक्षाशी कोणतेही डील करण्याच्या मनःस्थितीत मला पवार दिसले नाहीत. ‘‘भाजपकडून सरकार बनविण्यासंदर्भात विविध स्तरांवरून ऑफर्स येत आहेत’’ हे त्यांचे सांगणे होते. ‘‘लवकरच पंतप्रधान मोदी यांना भेटून मी भाजपबरोबर सरकार स्थापन करणे शक्य नाही असे सांगणार आहे’’ हे त्यांनी मला सांगितले. याच काळात पवार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मोदींना भेटायला गेले व महाराष्ट्रातील सरकार स्थापनेबाबत सांगायचे ते सांगून आले. त्यामुळे पवारांनी भाजपला शब्द दिला होता व त्यानुसार पहाटेच्या हालचाली झाल्या हे खोटेच आहे. मोठे अपघात दुर्दैवाने पहाटे चालक साखरझोपेत असतानाच होतात' असा खुलासा करत राऊतांनी फडणवीस यांना टोला लगावला.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser