आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद नामांतर:औरंगजेब कुणाला प्रिय असेल तर त्यांना कोपरापासून साष्टांग दंडवत! संजय राऊतांचा काँग्रेसच्या सेक्युलरवादी भूमिकेवर निशाणा

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • औरंगाबादचे नामांतर केल्याने मुसलमान समाज म्हणजे अल्पसंख्याक नाराज होतील व मत बँकेवर परिणाम होईल.

औरंगाबाद शहराच्या नामांतराचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. यावरुन राजकीय वाद निर्णाण झाला आहे. सत्ताधारी महाविकास आघाडीतील शिवसेना आणि काँग्रेस या विषयावरुन एकमेकांविरोधात उभे राहिले आहेत. 'औरंगजेब कुणाला प्रिय असेल तर त्यांना कोपरापासून साष्टांग दंडवत! हे वागणं ‘सेक्युलर’ नव्हे!' असे म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनामधून काँग्रेसच्या सेक्युलरवादी भूमिकेवरच निशाणा साधला आहे.

हिंदुस्थानची घटना ‘सेक्युलर’ आहेच. म्हणून बाबर, औरंगजेब, शाहिस्तेखान, ओवेसी वगैरे लोकांना सेक्युलर कसे मानावे? औरंगजेबाला तर परधर्माचा भयंकर तिटकारा. त्याने शिखांचा, हिंदूंचा छळच केला. त्यांच्या खुणा आपण का जतन कराव्यात? असा सवाल शिवसेनेने केला आहे.

सामना अग्रलेखात नेमके काय?

  • औरंगजेब कोण होता हे निदान महाराष्ट्राला तरी समजावून सांगण्याची गरज नाही. औरंगजेबाच्या दरबारातच छत्रपती शिवाजीराजांच्या स्वाभिमानाची तलवार तळपली. आग्र्याहून सुटका ही वीरगाथा त्यानंतरच घडली. महाराष्ट्राने औरंगजेबाशी मोठा लढा दिला. त्या लढय़ाचे नेतृत्व आधी छत्रपती शिवाजीराजांनी व नंतर छत्रपती संभाजीराजांनी केले. त्यामुळे सच्च्या मर्‍हाटी व कडवट हिंदू माणसाला औरंगजेबाविषयी लोभ असण्याचे कारण नाही. मराठवाडय़ातील सरकारी कागदोपत्री ‘औरंगाबाद’ नामे असलेल्या शहराचे नामकरण संभाजीनगर व्हावे यावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. काँग्रेससारखे ‘सेक्युलर’ पक्ष औरंगाबादचे संभाजीनगर होऊ नये या मताचे आहेत.
  • औरंगाबादचे नामांतर केल्याने मुसलमान समाज म्हणजे अल्पसंख्याक नाराज होतील व मत बँकेवर परिणाम होईल. म्हणजे स्वतःच्या सेक्युलर प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल. तिसरे म्हणजे औरंगाबादचे नामांतर केल्याने लोकांचे, विकासाचे प्रश्न सुटणार आहेत काय? असे मुद्दे नाव बदलण्यास विरोध करणारे उपस्थित करीत आहेत. ते काही असले तरी औरंगजेबाच्या कोणत्याही खुणा निदान महाराष्ट्रात तरी ठेवू नयेत या मताचा मोठा वर्ग आहेच.
  • महाराष्ट्रातील सर्वच पुढाऱयांनी औरंगजेबाचा रक्तरंजित इतिहास पुन्हा वाचायला हवा. निदान आपल्या बालपणातील इतिहासाची शालेय क्रमिक पुस्तके तरी नजरेखालून घालायला हवीत. औरंगजेब हा ‘सेक्युलर’ वगैरे कधीच नव्हता. त्याला इस्लाम धर्माधिष्ठत राज्यविस्तार करायचा होता. माझ्या राज्यात लाचलुचपत म्हणजे भ्रष्टाचार चालणार नाही असे तो बरळत असे, पण स्वतः औरंगजेब हा पैसे घेऊन पदव्या आणि सरदारक्या बहाल करीत असे. 1679 मध्ये त्याने जिझिया व इतर अनेक कर हिंदूंवर लादले. हिदूंचे उत्सव, धार्मिक क्रतवैकल्ये, पूजाअर्चा यावर निर्बंध आणले. औरंगजेब धर्मांध होता. त्याला हिंदुस्थानात फक्त इस्लाम धर्मच ठेवायचा होता.
  • इस्लामचा प्रचार, प्रसार करण्यासाठी त्याने खास यंत्रणा उभी केलीच, पण धर्मांतरावर भर दिला. धर्मांधतेपायी त्याने हिंदूंची देवालये, शाळा, धार्मिक व्यवहार, शिकवण मोडून काढण्याचे अधिकार आपल्या अधिकाऱयांना दिले. पूजाअर्चा सांगणारा ब्राह्मण वर्ग त्यामुळे दहशतीखाली जगू लागला. मथुरा येथील केशवदेवाचे मंदिर, वाराणसीचे विश्वनाथाचे व बिंदुमाधवाचे मंदिर, गुजरातमधील सोमनाथाचे मंदिर त्याने उद्ध्वस्त केले. याशिवाय तो जेव्हा स्वारीवर निघे तेव्हा वाटेत येणारी मंदिरे, शाळा तोडून पुढे जात असे. त्या प्रत्येक ठिकाणी तो मशिदी बांधत असे. कोणत्याही महत्त्वाच्या शासकीय पदावर हिंदूंना ठेवू नये असे फर्मान त्याने काढले.
  • धर्मांधता म्हणजे आदर्श राज्यव्यवस्था होऊ शकत नाही. त्याने राज्यविस्तारासाठी निर्घृण मार्गाचाच अवलंब केला. त्याने धर्माचेच राजकारण केले. जे मुसलमान नाहीत अशा काफीर लोकांना मारण्याकरिता जिहाद पुकारणे, रक्तपात करणे ही गोष्ट इस्लामी धर्माच्या विरुद्ध नाही असे औरंगजेब मानी व तो ते अमलात आणी. औरंगजेबाच्या जीवनात कपट, धर्मांधता, अमानुषता ठासून भरली होती. त्याने शिवाजीराजांना शत्रू मानलेच, पण छत्रपती संभाजींना हाल हाल करून मारले. असा औरंगजेब संभाजी राजांच्या बलिदानानंतरही पंचवीस वर्षे महाराष्ट्राशी लढत राहिला व शेवटी याच मातीत गाडला गेला. अशा औरंगजेबाच्या नावाने महाराष्ट्रात तरी एखादे शहर असू नये. ही धर्मांधता नसून शिवभक्ती म्हणा, महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणा, नाहीतर इतिहासाचे भान; पण असा औरंगजेब कुणाला प्रिय असेल तर त्यांना कोपरापासून साष्टांग दंडवत! हे वागणं ‘सेक्युलर’ नव्हे!
बातम्या आणखी आहेत...