आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. यात भाजप विधानसभेच्या 240 जागा लढवणार आहे. त्यामुळे जोरदार तयारीला लागा, अशा सूचना बावनकुळे कार्यकर्त्यांना देत आहेत.
म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला अवघ्या 48 जागा मिळणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. बावनकुळे यांच्या या वक्तव्यावरुन शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनीही संताप व्यक्त करत बावनकुळेंना जेवढे बोलण्याचा अधिकार आहे, तेवढेच बोलावे, असे सुनावले आहे.
बावनकुळे नेमके काय म्हणाले?
व्हायरल व्हिडिओमध्ये चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, 2024 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. या निवडणुकीत भाजप 240 जागा लढणार आहे. तर, शिवसेनेला 48 जागा दिल्या जातील. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारीला लागावे. साधारण दोन दिवसांपूर्वीचा हा व्हिडिओ आहे.
वादानंतर स्पष्टीकरण
दरम्यान, जागा वाटपाबाबतच्या या वक्तव्यावरुन वाद निर्माण होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी आज पत्रकार परिषदेत याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, मी जे बोललो त्यामधील केवळ अर्धाच भाग दाखवण्यात आला आहे. शिवसेना आणि भाजप मिळून विधानसभेच्या 288 आणि लोकसभेच्या 48 जागा लढणार आहे, असे मी म्हणालो होतो. अजून जागा वाटपाचे सूत्र ठरलेले नाही. यासंदर्भात कुठलीही चर्चा सुरू झाली
पुढे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, विधानसभेची निवडणूक ही देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या समन्वयाने लढली जाईल. राज्यातील विधानसभेच्या 288 जागा जिंकण्याची तयारी आम्ही सुरू केली आहे. आम्ही तशी तयारी सुरू केली आहे. त्यामुळे माझ्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आला.
संजय शिरसाट संतापले
दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळेंच्या या वक्तव्यावर संजय शिरसाट यांनी संताप व्यक्त केला आहे. संजय शिरसाट म्हणाले, जागा वाटपाचा निर्णय पक्षातील ज्येष्ठ नेते घेतात. अद्याप पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी जागा वाटपाचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. जागावाटपाबाबत बोलण्याचा चंद्रशेखर बावनकुळे यांना कोणताही अधिकार नाही. त्यामुळे बावनकुळेंना जेवढे अधिकार आहे, तेवढेच त्यांनी बोलायला हवे.
शिंदे गटाची लायकीच तेवढी - संजय राऊत
दुसरीकडे, बावनकुळेंच्या या वक्तव्यावरुन ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिंदे गटाला जोरदार टोला लगावला आहे. संजय राऊत म्हणाले की, शिंदे गटाची लायकीच हीच आहे. शिवसेनेने एका जागेसाठी भाजपसोबत युती तोडली होती. हा शिवसेनेचा स्वाभिमान होता. आता भाजप जे तुकडे फेकेल ते शिंदे गटाला आयुष्यभर चघळावे लागतील. पुढील निवडणुकीत भाजप 40 काय 5 जागाही शिंदे गटाच्या तोंडावर फेकणार नाही. भाजपला शिवसेनेचा रुबाब, दरारा नष्ट करायचा होता. त्यामुळेच भाजपने शिवसेना तोडली व फेकलेल्या तुकड्यावर जगणारे निर्माण केले.
शिंदे गटाचे नामोनिशाणही राहणार नाही
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही बावनकुळेंच्या वक्तव्यावरुन शिंदे गट व भाजपवर निशाणा साधला आहे. जयंत पाटील म्हणाले, शिंदे गट विधानसभा निवडणुकीपर्यंत टिकेल असे वाटत नाही. स्थानिक पक्षांना संपवण्याचे काम भाजपाकडून सुरू आहे. मित्र असो किंवा शत्रू असो त्यांना फोडणे, त्यांना नामोहरम करणे हाच भाजपचा एक कलमी कार्यक्रम आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीला अद्याप एक वर्ष बाकी आहे. तोपर्यंत शिंदे गटाचे नामोनिशाणही उरणार नाही. विधानसभा निवडणूक लागेल तेव्हा सर्व 288 जागांवर भाजप निवडणूक लढवेल.
हेही वाचा,
राजकारण पेटले:तुमचेही कुटुंब तुरुंगात जाईल, असे आमच्याकडे पुरावे; तोंड उघडायला लावू नका; संजय राऊतांचा फडणवीसांना इशारा
विरोधकांना नेस्तनाबुत करण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांनाही अडचणीत आणम्याचे घाणेरडे राजकारण राज्यात देवेंद्र फडणवीसांनी सुरू केले. केंद्रात मोदी आणि शहांनी असे राजकारण सुरू केले, अशी घणाघाती टीका आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली. तसेच, तुमचेही कुटुंब तुरुंगात जाईल, असे पुरावे आमच्याकडे आहेत. तोंड उघडायला लावू नका. अन्यथा महाराष्ट्रात स्फोट होईल, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला. वाचा सविस्तर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.