आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Sanjya Raut | Narayan Rane | Kirit Somaiya | 19 Banglo Case Alibag Rashmi Thackeray| Marathi News | Political Shimga On The Eve Of Holi; Rane Jumps In Raut Somaiya Controversy, Sanjay Raut Takes NCP's Betel Nut, His Eye On CM Post

तू-तू मैं-मैं:होळीच्या तोंडावर राजकीय शिमगा; राऊत-सोमय्या वादात राणेंची उडी म्हणाले- संजय राऊतांनी घेतली राष्ट्रवादीची सुपारी त्यांचा मुख्यमंत्रिपदावर डोळा

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • होय, मी राष्ट्रवादी... माझा डोळा मुख्यमंत्रिपदावर नव्हे, शिवसेना प्रसारावर

संजय राऊत यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर डोळा असून त्यांनी राष्ट्रवादीकडून सुपारी घेतली आहे. ते पूर्ण राष्ट्रवादीचे आहेत, असा सनसनाटी दावा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी बुधवारी केला. राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर राणे सरसावले असून त्यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन राऊतांवर हल्ला चढवला.

राऊत यांनी शिवसेनेसाठी पत्रकार परिषद घेतली की स्वत: अडचणीत आहेत म्हणून घेतली, असा सवाल करून जणू शिवसेनाप्रमुख हेच झालेत, अशा आवेशात राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांच्या पत्रकार परिषदेत केवळ नाशिकचे पदाधिकारी होते, मुंबईतला एकही कार्यकर्ता आलेला नव्हता. संपादकाच्या तोंडी शोभणार नाही अशी त्यांची भाषा होती, असे राणे म्हणाले. “राऊत हे १९९२ मध्ये शिवसेनेत आले. त्याआधी ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंवर टीका करायचे,’ असे सांगून राणे म्हणाले की, “शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर २६ वर्षांनी राऊत शिवसेनेत आले. १९९२ मध्ये ‘सामना’मध्ये ते संपादक म्हणून आले. त्यापूर्वी त्यांनी बाळासाहेब ठाकरेंविरुद्ध अनेक लेख लिहिले होते. “राऊत हा अंतर्गत आग कशी लावता येईल हे पाहत असतो,’ असे बाळासाहेब एकदा म्हणाले होते, अशी आठवण राणे यांनी सांगितली. तसेच राऊतांची कुंडली माझ्याकडे असून वेळ आल्यावर बाहेर काढेन,’ असे राणे म्हणाले.

भाजपविरोधातील आरोप बिनबुडाचे : भाजपविरोधात केलेले राऊत यांचे सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. किरीट सोमय्या, देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात करण्यात आलेल्या आरोपांमध्येही काही तथ्य नाही, असे सांगतानाच आरोप खरे असतील तर पत्रकार असणाऱ्या राऊतांनी पुरावे सादर करावेत. यापुढे भाजपच्या नेत्यावर आरोप कराल तर सर्व पुरावे ईडीकडे नेऊन देईन, असा इशारा राणे यांनी राऊत यांना दिला.

भाजप नेत्यांविरोधात आरोपांची राळ उडवून देणाऱ्या संजय राऊत यांनी बुधवारी एकाच वेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि किरीट सोमय्या यांच्या टीकेला उत्तर दिले. ‘होय, मी राष्ट्रवादी आहे, मी प्रचंड राष्ट्रवादी आहे. माझा डोळा मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर नाही, तर शिवसेनेच्या प्रसारावर आहे. शिवसेनेचा प्रसार जोरात होत आहे. येत्या लोकसभेपर्यंत शिवसेनेचा एवढा विस्तार होईल की शिवसेना दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचेल,’ असे प्रत्युत्तर राऊत यांनी राणेंना दिले. किरीट सोमय्या यांनी एका जमीन व्यवहारात ईडीच्या अधिकाऱ्याला १५ कोटी रुपये दिल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. वेळ पडल्यास त्या अधिकाऱ्याचे नावही आपण उघड करू असा दावा त्यांनी केला. तसेच सोमय्या बाप-बेटे नक्कीच तुरुंगात जाणार असे ते म्हणाले.

८ जेव्हीपीडी योजनेत सुजित नवाब यांच्या नावावर असलेला १०० कोटींचा प्लॉट किरीट सोमय्या यांनी मूळ मालकाला ईडीची धमकी देऊन मातीमोल भावाने खरेदी केला. हा प्लॉट किरीट सोमय्यांचे मित्र अमित देसाईंच्या नावावर करून घेतला. त्यातले १५ कोटी रुपये सोमय्यांनी कोणत्या अधिकाऱ्यास दिले हे ईडीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट करावे. नाहीतर त्या अधिकाऱ्याचे नाव घेईन, असा इशारा राऊत यांनी दिला. जालन्याचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनाही सोमय्या यांनी कसा आणि किती त्रास दिला हे मला माहीत आहे असे राऊत म्हणाले.

१९ बंगले आहेत कुठे ? कोण किरीट सोमय्या ?
रश्मी ठाकरेंच्या नावावर १९ बंगल्यांच्या आरोपाबद्दल छेडले असता राऊत म्हणाले, छोडो यार... कोण किरीट सोमय्या, कसले पुरावे? सोमय्या हे काय इन्व्हेस्टिगेशन अॅथॉरिटी नाही. मी सांगतोय, कारण मी जबाबदार माणूस आहे. भाजपने सांगावे की सोमय्या जबाबदार माणूस आहे म्हणून. तिथे बंगले आहेत की नाहीत हे सांगावे, कागदबिगद आहेत वगैरे सांगू नका. १९ बंगले कुठे आहेत ? देवस्थानाच्या जमिनी कुठे आहेत? संजय राऊत यांची बेनामी संपत्ती कुठे आहे? हे माझे प्रश्न आहेत, असे राऊत म्हणाले.

उद्धव ठाकरेंवरही तोंडसुख
या वेळी राणे यांनी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही तोफ डागली. इतका लाचार मुख्यमंत्री मी कधी पाहिला नव्हता, असे राणे म्हणाले. आम्ही कुणालाही घाबरत नाही, असे राऊत वारंवार का म्हणतात, असा सवालही राणे यांनी उपस्थित केला.

रश्मी ठाकरे बंगल्याची घरपट्टी भरतात, आता जोडे कुणाला मारणार ? : सोमय्या
भ्रष्टाचाराचे आरोप-प्रत्यारोप, व्यक्तिगत हेवेदावे, शिवराळ भाषेचा वापर करून सध्या महाराष्ट्रात होळीच्या तोंडावर राजकीय शिमगा केला जात आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर आरोप केल्यानंतर बुधवारी सोमय्यांनी पुन्हा राऊत यांच्यासह मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. या वादात आता केंद्रीय मंत्री नारायण राणेंनीही उडी घेतली आहे.

सन २०१३ ते २०२१ या काळात अलिबागमधील १९ बंगल्यांचा टॅक्स रश्मी उद्धव ठाकरे यांनी भरला आहे. तसेच मनीषा रवींद्र वायकर यांनीदेखील त्याचा टॅक्स भरला आहे. बंगले जर ठाकरेंच्या नावे नाहीत तर टॅक्स भरता कशाला? रश्मी ठाकरे आणि मनीषा वायकर यांनी जर लिहून दिले की, असे केलेले नाही तर एक नाही दोन जोडे मारा, असे आव्हान किरीट सोमय्या यांनी बुधवारी राऊत यांना दिले. या वेळी त्यांनी आपल्या पायातील जोडे हातात घेऊन दाखवले. संजय राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेला बुधवारी किरीट सोमय्या यांनी उत्तर दिले.

या वेळी त्यांनी अलिबागमधील १९ बंगले ठाकरे यांचेच असल्याचा दावा केला. राऊत यांनी माझ्याबाबत काही आरोप केले आहेत. माझी खुशाल चौकशी करा, असे सोमय्या म्हणाले. १९ बंगल्यांवर घेऊन जातो, बंगले नाही दिसले तर जोडे मारतो, असं ते म्हणाले. पण नेमके कोणाला जोडे मारायचे आहेत, असेही सोमय्या म्हणाले. या वेळी बोलताना सोमय्यांनी ग्रामपंचायतीने दिलेल्या कागदपत्रांचा पुरावादेखील दिला.

बातम्या आणखी आहेत...