आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामोठी राजकीय पार्श्वभूमी लाभलेल्या महाजन-मुंडे या मातब्बर घराण्यातील सारंगी प्रवीण महाजन या सध्या आत्मचरित्र लिहीत असून आपल्या आत्मचरित्रावर वेबसिरीज काढली जावी, अशी त्यांची इच्छा आहे. तसेच राजकारणात येण्याची तयारी करत असल्याचे त्यांनी एका पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे.
आपले पती प्रवीण महाजन यांनी त्यांचे मोठे बंधू प्रमोद महाजन यांची हत्या (२००६) केली. यावर आपला अजूनही विश्वास नसल्याचे सारंगी यांनी सांगितले. आमचा २३ वर्षांचा संसार होता. त्यावर मी पुस्तक लिहित आहे. त्यात बालपण, शिक्षण, महाजन कुटुंबातील वातावरण, प्रमोद महाजन यांच्या हत्येची घटना घडल्यानंतर कुटुंबीयांनी दिलेला त्रास, प्रवीण यांचा लढलेला खटला, प्रवीण यांची मनोवस्था या सर्व बाबी त्या पुस्तकात असणार आहेत.
प्रवीण यांच्या खटल्याकामी मी न्यायालयात जात होते, तेव्हा आपल्याला महाजन कुटुंबीयांकडून मोठा त्रास दिला गेला. त्यावेळी माझ्या मुलांच्या केसाला जरी धक्का जर लागला तर त्याला मुंडे-महाजन कुटुंबीय जबाबदार असतील, अशी पोलिसांत तक्रार दिल्याची आठवण सारंगी यांनी सांगितली. प्रवीण यांनी प्रमोद यांच्यावर गोळ्या झाडल्याचा खटला हेतू नसलेला होता. मी न्यायालयात याचिका केली होती. ती तीन वर्षांनी सुनावणीला आली. तोपर्यंत प्रवीण यांचे निधन झाले.
प्रमोद महाजन यांची हत्या दुर्दैवी असल्याचे मत
प्रमोद महाजन यांच्या हत्येची घटना दुर्दैवी होती. दोघा भावांतला तो विषय होता. त्याची माहिती मला अजूनही नाही, असे सारंगी यांनी स्पष्ट केले. मी अन् माझ्या दोन मुलांचा त्यात काय दोष, असे आजपर्यंत एकानेही मला विचारले नाही. तसेच पती प्रवीणच्या वडिलोपार्जित उस्मानाबाद येथील जमीन खटल्यात अजूनही महाजन कुटुंबीयांकडून त्रास दिला जात आहे, अशी खंत सारंगी यांनी व्यक्त केली. सारंगी यांनी २०१३ मध्ये “सारा’ नावाची सामाजिक संघटना चालू केली. विद्यार्थीदशेत “अभाविप’मध्ये काम केलेले आहे. सध्या त्या राजकारणात जाण्याच्या तयारीत आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी सारंगी यांची मैत्री आहे. त्यामुळे त्या राष्ट्रवादीत जाण्याची शक्यता आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.