आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अब्दुल सत्तार अज्ञातवासात:अजून आठवडाभर तरी ‘नॉट रिचेबल’; मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर बुलढाणा दौराही अचानक रद्द

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कृषिमंत्री अब्दुल सत्तार अज्ञातवासात गेल्याचे वृत्त आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कान टोचल्यानंतर सत्तार यांनी आजचा बुलढाणा जिल्ह्यातला दौरा रद्द केलाय.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सु्प्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे सत्तार चर्चेत आहेत. त्यांच्याविरोधात कार्यकर्त्यांनी राज्यभर आंदोलन सुरू केले आहे.

अचानक दौरा रद्द

सत्तार आज मंगळवारी बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. ते सकाळी सिंदखेडराजा येथे राजमाता जिजाऊंच्या जन्मस्थळाचे दर्शन घेणार होते. त्यानंतर चांगेफळ येथील अखंड हरीनाम सप्ताहाच्या सांगता कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावणार होते. मात्र, सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने सत्तारांना जिल्ह्यात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिला होता. त्यानंतर त्यांनी हा दौरा रद्द केला.

फोनवरून टोचले कान

अब्दुल सत्तार यांनी काल वादग्रस्त वक्तव्य केले. त्यानंतर काही वेळातच सॉरी म्हणत सावरासावर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या मुंबई आणि औरंगाबाद येथील घरासमोर निदर्शने केली. घरावर दगडफेक केली. वाढता प्रक्षोभ पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे कान टोचले. तसेच पुन्हा माफी मागण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर त्यांनी सिल्लोड येथील जाहीर सभेत पुन्हा दिलगिरी व्यक्त केली. आता त्यांना अज्ञातवासात राहण्याच्या सूचना दिल्याचे समजते. ते प्रतिक्रियेसाठी उपलब्ध होऊ शकले नाहीत.

राजीनामाच्या मागणी

अब्दुल सत्तारांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचे आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही समर्थन केले नाही. शिवाय सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्यपालांची भेट घेत त्यांना निवेदन दिले. यावेळी त्यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली.

फडणवीसांकडून अपेक्षा

आपल्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अपेक्षा नाहीत. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कृषिमंत्री अब्दुल सत्तारांचा राजीनामा घेणार का, असा रोखठोक सवाल शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे. ते औरंगाबादमध्ये बोलत होते.

ही पहिलीच वेळ नाही

आदित्य म्हणाले की, सत्तार असे बोलायची ही पहिलीच वेळ नाही. यापू्र्वीही त्यांनी विधाने केली आहेत. टीईटी घोटाळ्यात त्यांचे नाव आले. ओला दुष्काळ कुठे आहे, हे समोर आले नाही. ते शेतकऱ्यांना भेटले नाहीत. बांधावर गेले नाहीत. सुप्रियाताई, महिला खासदारच काय कुठल्याही महिलेला शिवीगाळ करणे हा घाणेरडा आणि गलिच्छ प्रकार आहे. आता त्यांच्या मनातले लोकांसमोर आले आहे. त्यांचा तातडीने राजीनामा घ्या, अशी मागणी त्यांनी फडणवीस यांच्याकडे केली.

बातम्या आणखी आहेत...