आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुख्यमंत्र्यांनी कुठल्या शहराचा काय उल्लेख केला, याने काही फरक पडत नाही. अशा नामांतर करण्याला मी गांभीर्याने घेत नाही, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे कर्तेधर्ते शरद पवार यांनी शुक्रवारी मांडली. पवार यांच्या भूमिकेने मुख्यमंत्र्यांना पाठबळच मिळाले असून विरोध करणाऱ्या काँग्रेस नेत्यांची मात्र मोठी गोची झाली आहे.
पवार हे आज यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पत्रकाराशी बोलत होते. नामांतरप्रकरणी त्यांना छेडले असता ते म्हणाले, आम्हा सरकारमधील तीन पक्षांत काहीच भांडण नाही. आता मुख्यमंत्री काही शहरांची नावे वेगळी लिहितात. पण, त्याने काय फरक पडतो? संभाजीनगर म्हणो, नाहीतर धाराशिव. मी हे गांभीर्याने घेत नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसने शहरांची नावे बदलण्याप्रकरणी कडाडून विरोध केला आहे. तसेच महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात शहरांची नावे बदलण्याचा विषय नाही याची आठवण शिवसेनेला करून दिली आहे. मात्र त्यानतंरही मुख्यमंत्री यांच्या समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये उस्मानाबादचा उल्लेख धाराशिव असा करण्यात आला.
राष्ट्रवादीने यापूर्वी शहरांच्या नामांतरास आपला विरोध असल्याचे म्हटले होते. इतकेच नाही तर मुख्यमंत्र्यांच्या पोस्टमध्ये संभाजीनगर उल्लेख कसा आला, याची चौकशी करण्याचे जाहीर केले होते. तसेच तिन्ही पक्ष एकत्र बसून यावर तोडगा काढतील, असे राष्ट्रवादीचे नेतेे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगतिले हाेते.
पवार यांच्या भूमिकेने मुख्यमंत्र्यांना पाठबळ मिळाले असून काँग्रेसच्या नामांतरविरोधी भूमिकेला वाटाण्याच्या अक्षता लावल्या गेल्या आहेत. परिणामी, यंदा राज्यातील १० महापालिकांच्या निवडणुकीत काँग्रेसची मोठीच गोची होण्याची शक्यता आहे.
१. यापूर्वी शिवसेनेचे मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना औरंगाबादच्या नामांतराचा प्रयत्न झाला होता. मात्र अर्ध्यात आलेले हे नामांतर प्रकरण विलासराव देशमुख यांच्या सरकारने हाणून पाडले होते.
२. सध्या औरंगाबादच्या विभागीय आयुक्तांनी औरंगाबादच्या नामांतरचा प्रस्ताव नगरविकास विभागाकडे पाठवला आहे. पालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेना नामांतर प्रकरणाला हवा देत आहे.
३. दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याक समाज काँग्रेसचा परंपरागत मतदार आहे. औरंगाबादचे नामांतर झाले तर औरंगाबदमधील उरलीसुरली काँग्रेस संपून जाईल, अशी काँग्रेस नेत्यांना भीती आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.