आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात पुन्हा कोरोनाने डोके वर काढले असून दैनंदिन रुग्णसंख्या पंधराशेच्या आसपास पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य प्रशासन सतर्क झाले असून वेगवेगळ्या उपाययोजनांसाठी चाचपणी सुरू आहे. “कोरोना रुग्णवाढीमुळे चिंता वाढली असली तरी काळजी घेऊन आणि आरोग्य विभागाच्या सल्ल्याने शाळा सुरू केल्या जातील,’ अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी रविवारी दिली.
वर्ष २०२२-२३ शैक्षणिक वर्षात राज्य मंडळाच्या शाळा १३ जून, तर केंद्रीय मंडळाच्या शाळा ८ जूनपासून भरत आहेत. कानपूर आयआयटीने जुलै महिन्यात देशात कोरोनाची तिसरी लाट येणार असा अंदाज व्यक्त केला आहे. मुंबईत कोरोना रुग्णांची प्रतिदिन संख्या ९०० च्या पुढे, तर राज्यात १४०० च्या पुढे गेली आहे. शुक्रवारी पनवेल येथे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड काँग्रेसच्या शिबिरात मार्गदर्शन करण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी त्यांना राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येसंदर्भात विचारले असता त्या म्हणाल्या की, “महाराष्ट्रात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पुन्हा एका चिंतेचा विषय आहे. शाळांसाठी नवी एसओपी (सुनिश्चित कार्यपद्धती) जारी करण्यात येईल. शाळांमध्ये मास्कसक्ती करायची की नाही याचा निर्णय काही दिवसांत घेण्यात येईल.’ विद्यार्थ्यांच्या लसीकरणाबाबत प्रश्न आहेत. लसीकरण वाढवण्याबाबत टास्क फोर्सशी सल्ला घेण्यात येईल व त्यांनी सांगितलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी केली जाईल, असे मंत्री गायकवाड यांनी स्पष्ट केले.
कोरोनामुळे शाळा सुमारे दोन वर्ष बंद राहिल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. विद्यार्थ्यांचे नवे शैक्षणिक वर्ष सुरू होण्याकरता काही दिवस राहिले आहेत. कोरोना रुग्णसंख्या देशभरात वाढत आहे. राज्यातही कोरोनाची रुग्णसंख्या वाढत चालली आहे. त्यामुळे आरोग्य विभाग आणि राज्य कोरोना कृतिदल यांच्याशी शिक्षण विभाग सल्लामसलत करणार आहे. त्यानंतर खबरदारी घेऊन शाळा उघडल्या जातील, असे गायकवाड म्हणाल्या.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह, गृह विलगीकरणात
मुंबई । विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. फडणवीसांनी स्वत: ट्वीट करत कोरोना झाल्याची माहिती दिली. शुक्रवारी फडणवीस लातूर दौऱ्यावर होते. तेथून ते सोलापूरलादेखील जाणार होते. मात्र, ताप आल्याने ते मुंबईला परतले. त्यानंतर त्यांनी आपली कोरोना चाचणी केली असता त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. सध्या ते गृह विलगीकरणात आहेत. दुसऱ्या लाटेतही त्यांना लागण झाली होती. दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी फडणवीस यांच्या ट्विटवर काळजी घ्या, लवकर आराम पडो, अशी सदिच्छा व्यक्त केली.
मतदानाचे काय ?
फडणवीस १० जून रोजी राज्यसभेच्या ६ जागांसाठी मतदान करू शकतील की नाही याबद्दल चर्चा सुरू आहे. नवीन नियमानुसार, तीन दिवसांनंतर त्यांची पुन्हा चाचणी होईल. यात ते निगेटिव्ह आले तर मतदान करता येऊ शकेल. अन्यथा निवडणूक आयोग जो निर्णय घेईल तो मान्य करावा लागेल.
बॉलीवूडमध्येही कोरोना संसर्गामुळे नवी चिंता, आता शाहरुख खान आढळला पॉझिटिव्ह अभिनेता कार्तिक आर्यन, आदित्य रॉय कपूर आणि कॅटरिना कैफनंतर आता शाहरुख खानही कोरोना पॉझिटिव्ह सापडला आहे. प्राप्त माहितीनुसार, शाहरुख सध्या ‘जवान’च्या चित्रीकरणात व्यग्र आहे. तथापि, तो पॉझिटिव्ह आल्यानंतर चित्रीकरणाचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. एक दिवसापूर्वी कार्तिक आर्यन आणि आदित्य रॉय कपूर कोविड पॉझिटिव्ह आले होते. निर्माता करण जौहरच्या ५० व्या वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी झाल्यानंतर ५५ पाहुणे कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले जात आहे. या पार्टीत कॅटरिना, शाहरुख खान, आमिर खान, सलमान खान, ऐश्वर्या राॅय आणि अभिषेक बच्चनसह अनेक स्टार्स सहभागी झाले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.