आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलासा:राज्यात कोरोनामुक्त गावे-शहरांत इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा उघडणार; शाळा उघडण्याचा सर्वस्वी निर्णय ग्रामपंचायतीच्या हाती

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने सोमवारी जारी केला शासन निर्णय

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड वर्षापासून राज्यातील शाळांना असलेले कुलूप लवकरच उघडण्यात येणार आहे. कोरोनामुक्त गावे वा शहरांत इयत्ता ८ वी ते १२ वीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबतचा शासन निर्णय विभागाने सोमवारी जारी केला आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने १४ जून २०२१ रोजी काढलेल्या पत्रान्वये १५ जून २०२१ पासून राज्याच्या सर्व भागांत तर विदर्भात २८ जून २०२१ पासून शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे.

या तारखांपासून शिक्षकांना शाळेत उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. १८ वयापर्यंतच्या मुलांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता कमी आहे. मात्र शाळा सुरू केल्या नाही तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढणे कठीण जाईल. त्यात मोबाइल इंटरनेटचा गैरवापर होत असून बालके शिक्षणापासून वंचित राहत आहेत, असा शिक्षण विभागाचा दावा आहे. त्यामुळे शाळांचे कुलूप किमान कोरोनामुक्त गावात आणि नगरपंचायती किंवा नगरपालिकांसारख्या छोट्या शहरांत उघडले जाणार आहे.

विद्यार्थी-शिक्षक प्रवासासंबंधी नियम
शाळेतील शिक्षकांची राहण्याची व्यवस्था शक्यतो त्याच गावात करण्यात यावी. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर टाळावा. पालकांनी शक्यतो स्वत:च्या वाहनाने विद्यार्थ्यांना शाळेत सोडावे.

स्वच्छतेबाबतची नियमावली
टेबल-खुर्च्या, जिने, प्रयोगशाळा, स्वच्छतागृहे येथे वारंवार निर्जंतुकीकरण करावे. बाहेरील व्यक्तीस शाळा आवारात प्रवेश देऊ नये. हात धुण्यासाठी शाळेत पुरेसे पाणी व साबण सामग्री ठेवण्यात यावी. ज्या विद्यार्थ्यांच्या घरी कुटुंबीयांना खोकला, ताप असेल अशांना शाळेत पाठवू नये. शैक्षणिक साहित्याची विद्यार्थ्यांनी इतरांशी अदलाबदल करू नये.

शाळा सुरू करण्याची कार्यपद्धती
1. कोविडमुक्त गावातील ग्रामपंचायतीने इयत्ता ८ वी ते इयत्ता १२ वीचे वर्ग सुरू करण्याबाबत पालकांशी चर्चा करून ठराव करावा.
2. मुलांना टप्प्याटप्याने शाळेत बोलावण्यात यावे. उदा. वर्गांना अदलाबदलीच्या दिवशी/सकाळी-दुपारी, ठराविक विषयांसाठी प्राधान्य द्यावे.
3. एका बाकावर एकच विद्यार्थी, दोन बाकांमध्ये ६ फूट अंतर, वर्गात १५-२० विद्यार्थी असावेत. लक्षणे असल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात यावे.

शिक्षक व कर्मचाऱ्यांची कोरोनाचा चाचणी सक्तीची
शाळा सुरू करण्यापूर्वी शिक्षक व सर्व कर्मचाऱ्यांच्या आरटीपीसीआर किंवा अँटिजन चाचणीची सक्ती करण्यात आली आहे. शाळा परिसरात थुंकण्यावर बंदी असेल. तसेच विद्यार्थी व शिक्षक-कर्मचाऱ्यांसह सर्वांनाच मास्कची सक्ती असणार आहे. शाळा केव्हापासून सुरू करायची याचा सर्वस्वी निर्णय ग्रामपंचायतीच्या हाती असणार आहे.

बातम्या आणखी आहेत...