आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराधर्मनिरपेक्ष तत्वाचा पुरस्कार आणि अंगिकार करणाऱ्या संविधानाने सामाजिक शांतता, कायदा व सुव्यवस्था, राष्ट्राची एकात्मता आणि आरोग्याची काळजी घेऊन प्रत्येक नागरिकाला धार्मिक स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार दिला आहे. परंतु कुठे एखाददुसरी गुन्हेगारी घटना घडली की त्याचे भांडवल करुन लव्ह जिहादसारख्या खोट्या सबबी पुढे करुन आंतरधर्मिय विवाहावर बंदी घालण्यासाठी कायदे करण्याचा घाट रचला जात आहे, असा आरोप सेक्युलर मुव्हमेंट व सेक्युलर आर्ट मुव्हमेंट संघटनेने केला आहे.
याविरोधात रविवारी 5 जानेवारी रोजी दादरमध्ये 'संवैधानिक धार्मिक स्वातंत्र्य हक्क परिषदे'चे आयोजन करण्यात आले आहे.
सेक्युलर मुव्हमेंट व सेक्युलर आर्ट मुव्हमेंटने म्हटले आहे की, आंतरधर्मिय विवाहावर बंदी घालण्यासाठी वातावरण निर्मिती करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणजे महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांमध्ये धर्मांतरबंदीचा कायदा करण्यासाठी मोर्चे निघू लागले आहेत. धर्मांतरबंदीचा कायदा करुन नागरिकांच्या धार्मिक स्वातंत्र्यावर घाला घालण्याचा हा डाव आहे. आपला आयुष्याचा जोडीदार निवडण्याचे मूलभूत व्यक्तीस्वातंत्र्यही हिरावून घेतले जात आहे. त्याहीपेक्षा या देशातील सामाजिक विषमता नष्ट करुन समता प्रस्थापित करण्यासाठी संविधानाचे शिल्पकार डॉ़. बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मक्रांती घडवून आणली, ती पराभूत करण्यासाठी धर्मांतरबंदी कायदा करुन धममक्रांतीचा पायाच उखडून टाकण्यासाठी दोन हजार वर्षानंतर पुन्हा एकदा प्रतिक्रांती घडवून आणण्याचे हे षडयंत्र आहे. म्हणून आता सावध होण्याची गरज आहे.
संवैधानिक धार्मिक स्वांतत्र्य हक्क परिषदच्या आयोजन
सेक्युलर मुव्हमेंट व सेक्युलर आर्ट मुव्हमेंटच्या वतीने दादर येथील मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात आयोजित संवैधानिक धार्मिक स्वातंत्र्य हक्क परिषदेत प्रा. गौतमीपुत्र कांबळे (ज्येष्ठ विचारवंत, फुले-आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक) अध्यक्षस्थानी असणार आहेत. या व्यतिरिक्त अविनाश पाटील (अध्यक्ष अंधश्रद्धा निर्मूलन समिती) आणि ॲड. असिम सरोदे (ज्येष्ठ विधिज्ञ) या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.