आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
राज्यातील काही नेत्यांच्या सुरक्षेमध्ये कपात करण्यात आली आहे. तर काही जणांना नव्याने सुरक्षा पुरवण्यात आली आहे. यावरुन आता राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळतेय. विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजप नेते चंद्रकांत पाटील, प्रविण दरेकर, प्रसाद लाड यांच्यासह मोठ्या विरोधी पक्ष नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानंतर विरोधकांकडून राज्य सरकारवर टीका केली जातेय.
सुडाचे राजकारण
भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सरकारच्या या निर्णयावर टीका केली. ते म्हणाले, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत मोठी कपात करण्यात येईल. तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचीही सुरक्षा कमी करण्यात येईल. सरकारचा हा निर्णय म्हणजे हे कोत्या मनोवृत्तीचे, सुडाचे राजकारण असल्याचा आरोप केशव उपाध्ये यांनी केला आहे.
महाविकास आघाडीही देखील भाजपसारखी कुचक्या मनाचीच निघाली
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही सुरक्षा काढून घेण्यात आलेली आहे. यावरुन मनसेच्या नेत्या रुपाली पाटील- ठोंबरे यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला. सोशल मीडियाच्या माध्यमातून रुपाली म्हणाल्या, ज्यांच्याकडे एवढी महाराष्ट्र सैनिकांची सुरक्षा आहे. त्यांची झेड सुरक्षा काढून काय तीर मारणार आहे. शेवटी महविकास आघाडी पण भाजपासारखी कुचक्या मनाचीच निघाली.
'माझे कुटुंब माझी जबाबदारी' हे मनावर घेतले
दरम्यान वरुण सरदेसाई यांना सुरक्षा पुरवण्यात आली आहे. यावरुन मनसेचे नेते संदीप देशपांडेंनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. कोरोना काळातील राज्य सरकारची मोहीम असलेल्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’वरुन देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला. 'वरुण सरदेसाई यांना दिलेली सुरक्षा म्हणजे "माझे कुटुंब माझी जबाबदारी " हे वाक्य मुख्यमंत्रांनी एकदम गंभीर्यानी घेतलेले दिसतंय...'
वरुण सरदेसाई यांना दिलेली सुरक्षा म्हणजे "माझे कुटुंब माझी जबाबदारी " हे वाक्य मुख्यमंत्रांनी एकदम गंभीर्यानी घेतलेले दिसतंय...
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) January 11, 2021
यांची सुरक्षा रद्द : अंबरीशराव अत्राम, संजय बनसोडे, सुधीर मुनगंटीवार, रावसाहेब दानवे, राजकुमार बडोले, हरिभाऊ बागडे, राम कदम, प्रसाद लाड, मारोतराव कोवासे, शोभाताई फडणवीस, कृपाशंकर सिंह आणि माधव भंडारी आदी नेत्यांना देण्यात आलेली वाय प्लस एस्कॉर्टसह वाय प्लस, वाय आणि एक्स दर्जाची सुरक्षा रद्द करण्यात आली आहे.
यांची वाढवली : विधान परिषदेचे अध्यक्ष रामराजे निंबाळकर, मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार,शत्रुघ्न सिन्हा यांना वाय प्लस एस्कॉर्टसह आमदार वैभव नाईक यांना एक्स, संदिपान भुमरे, अब्दुल सत्तार, दिलीप वळसे पाटील आणि सुनील केदार आदी मंत्र्यांना वाय दर्जाची, तर यू.डी.निकम यांना झेड प्लस सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई, ओबीसी आरक्षण समितीचे प्रकाश शेंडगे यांना एक्स दर्जाची सुरक्षा बहाल केली आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.