आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजकीय सुरक्षा:देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, रावसाहेब दानवे यांच्यासह विरोधी नेत्यांच्या सुरक्षेत कपात!

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीला एक्स दर्जा, अमृता फडणवीसांची सुरक्षा घटवली

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची झेड दर्जाची सुरक्षा काढून घेण्यात आली. सुरक्षा कपातप्रकरणी विरोधकांनी सरकारवर टीका केली, तर फेरनियोजन नियमानुसार केल्याचा सरकारचा दावा आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्र्यांना व नेत्यांना मिळणाऱ्या सुरक्षेविषयी आढावा मध्यंतरी घेण्यात आला होता. त्यानंतर गृह विभागाने संबंधित विभागांना शुक्रवारी आदेश जारी केले. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, नारायण राणे यांची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई, ओबीसी आरक्षण समितीचे प्रकाश शेंडगे यांना एक्स दर्जाची सुरक्षा बहाल केली आहे. मात्र शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांचे वाढीव सुरक्षेच्या यादीत नाव नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

सुरक्षेची वर्गवारी
एसपीजी
: सुरक्षा व्यवस्था देशातील सर्वोत्तम आहे. देशाचे पंतप्रधान, माजी पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबाला दिली जाते.

झेड प्लस : यात सुरक्षेसाठी ५५ रक्षक असतात. १० पेक्षा जास्त एनएसजी कमांडो असतात. झेड प्लस सुरक्षा व्यवस्थेत एस्कॉर्ट आणि वाहनसुद्धा दिले जाते.

झेड : सुरक्षा व्यवस्थेत पाच एनएसजी कमांडो व त्यांच्यासोबत २२ सुरक्षा रक्षक असतात. या प्रकारच्या सुरक्षेत दिल्ली पोलिस, आयटीबीपी आणि सीआरपीएफचे जवान असतात.

वाय : तुलनेने कमी धोका असलेल्या व्यक्तींना ही सुरक्षा दिली जाते. यात ११ सुरक्षा रक्षक असतात.

एक्स : सुरक्षा श्रेणीमध्ये दोन सुरक्षा रक्षक दिले जातात. देशात अनेक महत्त्वाच्या व्यक्तींना या प्रकारची सुरक्षा दिलेली आहे.

यांची सुरक्षा रद्द : अंबरीशराव अत्राम, संजय बनसोडे, सुधीर मुनगंटीवार, रावसाहेब दानवे, राजकुमार बडोले, हरिभाऊ बागडे, राम कदम, प्रसाद लाड, मारोतराव कोवासे, शोभाताई फडणवीस, कृपाशंकर सिंह आणि माधव भंडारी आदी नेत्यांना देण्यात आलेली वाय प्लस एस्कॉर्टसह वाय प्लस, वाय आणि एक्स दर्जाची सुरक्षा रद्द करण्यात आली आहे.

यांची वाढवली : विधान परिषदेचे अध्यक्ष रामराजे निंबाळकर, मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार,शत्रुघ्न सिन्हा यांना वाय प्लस एस्कॉर्टसह आमदार वैभव नाईक यांना एक्स, संदिपान भुमरे, अब्दुल सत्तार, दिलीप वळसे पाटील आणि सुनील केदार आदी मंत्र्यांना वाय दर्जाची, तर यू.डी.निकम यांना झेड प्लस सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे.

राजकीय आधारावर सुरक्षेचा निर्णय : फडणवीस
नागपूर | आम्ही सुरक्षेच्या भरवशावर राहणारे नाही. मी फिरत राहीन. याकूब मेमनची फाशी आणि नक्षलवादी कारवायांनंतर असलेला धोका लक्षात घेता माझ्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. मागील वर्षीही अशा प्रकारच्या धोक्यांची सूचना मिळाली होती. आता सरकार राजकीय आधारावर सुरक्षा देत आहे,अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

सुरक्षा घटवण्याची पवारांची मागणी : गृहमंत्री
नागपूर | केंद्रात कृषिमंत्री तसेच राज्यात चारदा मुख्यमंत्रिपद भूषवलेले असूनही भारतीय जनता पार्टीच्या काळात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना एक पायलट कार आणि एस्काॅर्टसुद्धा नव्हता, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्टीकरण दिले. विशेष म्हणजे शरद पवार यांनी मला स्वत: फोन करून व पत्र लिहून त्यांचीही सुरक्षा कमी करण्यास सांगितले,असे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...