आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगरविकास मंत्री व शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांची बंडखोरी शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावर योग्य तोडगा काढतील, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.
पवार म्हणाले, माझे शिंदेच नाही तर कुणाशीही बोलणे झाले नाही. शिंदे यांनी ठाकरे यांच्यासमोर भाजपसोबत सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवल्याची मला कल्पना नाही. त्यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा असल्याचेही मला माहीत नाही. या सर्वांवर उद्धव ठाकरे योग्य तो तोडगा काढतील व सरकार त्यांच्या नेतृत्वात यापुढेही सक्षमपणे चालेल, असा मला विश्वास आहे,’ असेही पवार यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्यापूर्वी भाजपने आमदार फोडण्याचा प्रयत्न केला होता. पण, तो फोल ठरला.
त्यानंतर सलग अडीच वर्षे सरकार सुरळीत चालत आहे. त्यामुळे भाजपकडून सरकार पाडण्याचे असे प्रयत्न होत आहेत. एकनाथ शिंदे व अमित शहा यांची मंगळवारी रात्री बैठक होणार आहे. याबाबत पवार म्हणाले, कुणी कुणाची भेट घ्यावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. माझी कुणाशीही चर्चा झाली नाही. माझी मुख्यमंत्र्यांशीही याबाबत चर्चा झाली नाही. रात्री मुंबईत गेल्यानंतर आम्ही सर्व नेते निर्णय घेऊ, असेही ते म्हणाले. महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नसल्याचेही पवार यांनी या वेळी सांगितले. भाजपबरोबर जाणार नाही राज्यातील सरकार पडल्यास राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार का, असा प्रश्न पवारांना करण्यात आला. त्यावर त्यांनी असे काहीही होणार नसल्याचे स्पष्ट केले. आम्ही विरोधी बाकावर बसू, पण भाजपबरोबर जाणार नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.