आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सुप्रसिद्ध विदुषी, सामाजिक कार्यकर्त्या प्राध्यापिका पुष्पा भावे यांचे रात्री साडेबाराच्या सुमारास मुंबईत निधन झाले. त्या 81 वर्षांच्या होत्या. आज सकाळी शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
विद्यार्थीदशेपासून राष्ट्र सेवा दल आणि लोकशाहीवादी चळवळींशी पुष्पाताईंचा संपर्क होता. संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, गोवामुक्ती आंदोलन अशा सत्याग्रहांमध्ये त्यांनी भाग घेतला होता. स्वातंत्र्योत्तर काळात महागाईविरोधी आंदोलनामध्ये अहिल्याताई रांगणेकर आणि मृणाल गोरे यांच्यासमवेत पुष्पाताई या लाटणे मोर्चात हिरिरीने सहभागी झाल्या होत्या.
मुंबईतील गिरणी कामगार संघर्ष समितीच्या चळवळीला वैचारिक मार्गदर्शन करण्यापासून कामगारांना हक्काचे घर मिळावे यासाठी सरकारशी संघर्ष करण्यात पुष्पाताई अग्रभागी होत्या. स्त्रीवादी चळवळीची पाठराखण करणाऱ्या पुष्पाताईंनी दलित स्त्रियांच्या संघटनेमध्ये स्वतंत्र वैचारिक भूमिका घेत संघटन केले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये त्या आरंभापासून होत्या.
डॉ. बाबा आढाव यांच्या असंघटित कामगार चळवळीत हमाल, रिक्षावाले, कागद-काच-पत्रा वेचणारे अशा कष्टकऱ्यांच्या आंदोलनांमध्ये त्या समर्थक राहिल्या. सामाजिक कृतज्ञता निधी या सामाजिक कार्यकर्त्यांना मानधन देणाऱ्या उपक्रमामध्ये पुष्पाताई सतत अग्रभागी असत.
पुष्पा भावे यांचा जन्म 26 मार्च 1939 रोजी झाला होता. मराठी व संस्कृत हे विषय घेऊन त्यांनी मुंबईच्या एलफिन्स्टन कॉलेजातून एम.ए. ची पदवी प्राप्त केली आणि मुंबईतच सिडनहॅम महाविद्यालयात त्या प्राध्यापक म्हणून रूजू झाल्या. त्यानंतर दयानंद कॉलेज, म.ल. डहाणूकर महाविद्यालय आणि चिनॉय महाविद्यालय येथे त्यांनी मराठीचे अध्यापन केले आणि शेवटी रुईया कॉलेजमधून त्या निवृत्त झाल्या.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.