आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपचे 'मिशन मुंबई':150 जागा जिंकण्याचे टार्गेट; उद्धव यांना शिक्षा दिल्याशिवाय स्वस्थ बसू नका, अमित शहांची कार्यकर्त्यांना सूचना

मुंबई24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी उपस्थित होते. - Divya Marathi
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी उपस्थित होते.

केंद्रीय गृहमंत्री व भाजप नेते अमित शह यांनी सोमवारी (५ सप्टेंबर) मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजाच्या दर्शनाने मुंबई दौऱ्याचा शुभारंभ केला. निमित्त दर्शनाचे असले तरी बीएमसी निवडणुकांसाठी भाजपने ‘मिशन मुंबई’ला सुरुवात केली. देवेंद्र फडणवीस यांच्या ‘मेघदूत’ बंगल्यावर मुंबईतील भाजप नगरसेवक-पदाधिकाऱ्यांची दुपारी बैठक पार पडली. या वेळी शहा यांनी बीएमसीच्या सध्याच्या ८३ जागांवरून १५० जागा जिंकण्याचा नारा दिला. ‘फक्त दोन जागांसाठी शिवसेनेने २०१४ मध्ये युती तोडली, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी धोका दिला, त्यांना शिक्षा दिल्याशिवाय स्वस्थ बसू नका,’ असे अमित शहा या वेळी म्हणाले.

शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या घरी जाऊन गणपतीचे दर्शन घेतले. दिल्लीला जाण्यापूर्वी शहा यांनी कोअर कमिटीच्या सदस्यांची विमानतळावरच बैठक घेतल्याचे समजते. एकूणच आगामी मुंबई मनपात भाजप संपूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरणार असून शिंदे-फडणवीस यांच्यासाठी ही अस्तित्वाची लढाई आहे.

मनपा निवडणूक अस्तित्वाची लढाई

  • शिवसेना-भाजपतील संघर्ष उत्तरोत्तर वाढत जाईल. त्याचे पडसाद राज्यात उमटूू शकतात. शिंदे - फडणवीसांचा सर्वस्वी फोकस मुंबई महापालिका निवडणूक राहील.
  • हिंदुत्ववादी मतांमध्ये सेनेला मिळणारा वाटा भाजपला आता नको आहे. त्यासाठी सेना हिंदूविरोधी असल्याचे भाजप मतदारांना पटवून देण्याचा प्रयत्न करत आहे.
  • शिवसेनेने हिंदुत्व सोडल्याचा भाजपला सातत्याने आरोप करावा लागत आहे. अमित शहा यांनी शिवसेना कशी हिंदूविरोधी आहे, हे सांगण्याचा पुन्हा एकदा आज प्रयत्न केला.
  • युती कुणी तोडली, हा मराठी मतदारांसाठी कळीचा मुद्दा आहे. त्यामुळे भाजप सातत्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युती तोडून विश्वासघात केल्याचा आरोप करत आहे.

शेवटची निवडणूक असल्याचे समजून लढा - फडणवीस

बीएमसीची निवडणूक शेवटची आहे, असे समजून लढण्याचा संदेश फडणवीसांनी दिला. फडणवीस- शिंदे यांच्यासाठी ही निवडणूक राजकीय कलाटणी देणारी असेल. मुंबई पालिका जिंकण्यासाठीच आघाडी सरकार उलथवून टाकण्याची जोखीम उचलली आहे. भाजपचा पराभव झाला तर फडणवीस -शिंदे यांच्या सरकारवरही याचे परिणाम होऊ शकतात.

राज ठाकरेंच्या मनसेला सोबत घेत मिशन गाठणार

बीएमसीत २२७ प्रभाग आहेत. २०१७ मध्ये भाजपचे ८३ तर सेनेचे ८६ नगरसेवक जिंकले. या वेळी भाजपने मिशन १५० चार नारा दिलाय . मुंबईत मराठी ४२, हिंदी ३९ व गुजराती भाषिक १९% मतदार आहेत. भाजपला स्वबळावर आकडा गाठणे अशक्य आहे. शिंदे गटाची ताकद नसल्यात जमा आहे. त्यासाठी भाजपला राज ठाकरे यांच्या मनसेला सोबत घ्यावे लागेल.

आम्ही पहिल्यापासूनच जमिनीवर - पेडणेकर

मुंबईकरांना तुमचे धोके आणि खोकेदेखील नको आहेत. आम्ही पहिल्यापासूनच जमिनीवर आहोत, आम्हाला काय जमीन दाखवणार! लवकरच भाजपला त्यांची जागा दाखवू, असे प्रत्युत्तर शिवसेना उपनेत्या किशोरी पेडणेकर यांनी दिले. दरम्यान, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, अरविंद सावंत आणि मनीषा कायंदे यांनीही भाजपला खडे बोल सुनावले.

बातम्या आणखी आहेत...