आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत पोस्ट केल्याप्रकरणी दूरचित्रवाहिनी मालिकांमध्ये काम करणारी अभिनेत्री केतकी चितळे हिला शनिवारी (१४ मे) ठाणे पोलिसांनी अटक केली. केतकी चितळेला शनिवारी सायंकाळी कळंबोली पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिस घेऊन जात असताना राष्ट्रवादी महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केतकीवर अंडी अन् शाई फेकून तिचा निषेध केला. दरम्यान, नाशिक येथेही शरद पवार यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या निखिल भामरे (रा. पिंगळवाडे, ता. सटाणा) या संशयिताला दिंडोरी पोलिसांनी अटक केली .
केतकी नवी मुंबईच्या कळंबोलीतील अव्हेलॉन इमारतीत राहते. ठाण्यातील कळवा (जि. ठाणे) पोलिस ठाण्यात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते स्वप्निल नेटके यांनी तिच्याविरोधात तक्रार दिली होती. राज्यभरात केतकीविरोधात ठिकठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. केतकीला सायंकाळी वाशी येथील मनपा रुग्णालयात नेण्यात आले. तेथे वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तिला ठाणे पोलिस घेऊन गेले आहेत. शनिवारी दिवसभर याप्रकरणी सत्ताधारी व विरोधी नेत्यांनी केतकीचा निषेध नोंदवला तसेच याप्रकरणी कारवाईची मागणी केली. केतकीवर राज्यभरातून टीका होत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचा निषेध केला.
ब्राह्मण महासंघाकडून निषेध :अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने केतकीच्या आक्षेपार्ह पोस्टचा निषेध केला. आमचे राष्ट्रवादीशी वैचारिक मतभेद आहेत, पण कुणाच्या आजारावर व्यंगात्मक टीका करणे विकृती आहे, अशी भूमिका महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे (पुणे) यांनी व्यक्त केली.
ही महाराष्ट्राची संस्कृती नाही : राज ठाकरे
आक्षेपार्ह पोस्टनंतर केतकीवर सर्व स्तरांतून टीका होत असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली. ही महाराष्ट्राची संस्कृती नसून याकडे लक्ष देण्याची गरज नाही. विचाराचा मुकाबला विचारांनी करायचा असतो. आमचे त्यांच्याबरोबर मतभेद जरूर आहेत आणि राहतील. पण अशा घाणेरड्या पातळीवर येणे साफ चूक असल्याचे राज यांनी स्पष्ट केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.