आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका करताना आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी षंढ हा शब्द वापरला. त्यावर संजय राऊतांनी तोंड आवरावे, अन्यथा जशास तसे प्रत्युत्तर देऊ, असा इशारा मंत्री शंभूराज देसाई यांनी दिला.
सीमावाद सोडवण्यासाठी शिंदेंचे प्रयत्न
आज पत्रकार परिषद घेत शंभूराज देसाईंनी सीमावादावर आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच, संजय राऊतांनीही प्रत्युत्तर दिले. देसाई म्हणाले, सीमावादाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारंवार केंद्रापुढे महाराष्ट्राची बाजू भक्कमपणे मांडली आहे. याप्रकरणी केंद्राने महाराष्ट्र सरकार व कर्नाटक सरकार या दोघांनी एकत्र आणून त्यांच्यात चर्चा घडवून समेटाने वाद मिटवावा, अशी मागणी शिंदेंनी केली आहे. सीमावाद सोडवण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे प्रयत्न करत असतानाही संजय राऊत त्यांना षंढ शब्द वापरत असतील तर तो आम्ही सहन करणार नाही.
जनता सहन करणार नाही
शंभूराज देसाई म्हणाले, संजय राऊत यांना न्यायालयीन संरक्षणात बेळगावमध्ये बोलावले होते. न्यायालयाच कवचकुंडल असतानाही ते बेळगावला जाऊ शकले नाहीत. त्यामुळे संजय राऊत मोठे षंढ आहेत, असे म्हटले तर त्यांना चालेल का? त्यामुळे आमची संजय राऊतांना विनंती आहे की, त्यांनी आपले तोंड आवरावे. महाराष्ट्राची जनता हे सहन करणार नाही.
पुन्हा तुरुंगात जाल
शंभूराज देसाई म्हणाले, संजय राऊत नुकतेच साडेतीन महिन्यांनंतर तुरुंगातून बाहेर आले आहेत. त्यांना बाहेरचे वातावरण सुट होत नाही, असे दिसत आहे. ते जर असेच वक्तव्य करत राहिले तर लवकरच त्यांच्यावर पुन्हा आराम करण्याची वेळ येईल, असा इशाराही देसाईंनी दिला.
शिवसेनेला राष्ट्रवादीच्या दावणीला बांधले
संजय राऊतांनी शरद पवारांच्या नेतृत्वात बेळगावला जाऊ, असे वक्तव्य केले आहे. त्यावरही शंभूराज देसाईंनी हल्ला चढवला. देसाई म्हणाले, संजय राऊतांना उद्धव ठाकरेंपेक्षा शरद पवारांचे नेतृत्व मोठे वाटते का? आम्ही अडीच वर्षांपूर्वीच उद्धव ठाकरेंना सांगत होतो की राऊत पूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आहारी गेले आहेत. त्यांनी शिवसेनेला राष्ट्रवादीच्या दावणीला नेऊन बांधले आहे. संजय राऊत यांनी आपल्या नेतृत्वाच स्थान बदलले आहे, हे आता स्पष्ट झाले आहे.
तसेच, सीमाभागातील 850 गावातील लोकांच्या भावना या महाराष्ट्रात राहण्याच्या आहेत. मी व मंत्री चंद्रकांत पाटील लवकरच या नागरिकांची भेट घेणार आहोत. याशिवाय कोर्टातही आम्ही मजबूत दावा मांडणार आहोत, असे देसाई म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.