आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोर्टाने समन्स बजावूनही ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत बेळगावला का गेले नाहीत? राऊत मुंबईत बसूनच जीवाला धोका आहे म्हणून ओरडले, अशा शब्दांत मंत्री शंभूराज देसाई यांनी बेळगाव दौऱ्यावरून राऊतांना प्रत्युत्तर दिले आहे.
तसेच, मी व मंत्री चंद्रकांत पाटील यांचा बेळगाव दौरा रद्द झालेला नाही. आम्ही लवकरच बेळगावचा दौरा करणार आहोत, असेही शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र - कर्नाटक सीमा प्रश्नावर समन्वयक मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आलेले राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील आणि उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांचा आज होणारा बेळगाव दौरा रद्द करण्यात आला आहे. यावरून विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. याला आज पत्रकार परिषद घेत शंभूराज देसाईंनी प्रत्युत्तर दिले.
आज वाद होणे उचित नाही
शंभूराज देसाई म्हणाले, आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे. अशावेळी आमच्या दौऱ्यामुळे कोणताही गोंधळ, वाद होणे उचित होणार नाही. महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला आम्ही जाणार होतो. मात्र, महाराष्ट्र कर्नाटक सीमावादामुळे या कार्यक्रमाला गालबोट लागून दलित बांधवांच्या भावनांना ठेच पोहोचू नये, अशी आमची भूमिका आहे. त्यामुळेच आजचा दौरा आम्ही रद्द केला.
तुमचे धाडस मुंबईपुरते
संजय राऊतांना प्रत्युत्तर देताना शंभूराज देसाई म्हणाले, सीमाभागाला टच तरी करून या, असे आम्हाला सांगत आहात. मात्र, तुम्हाला तर कोर्टाने नोटीस बजावूनही तुम्ही गेले नाहीत. मुंबईत बसूनच आमच्या जीवाला धोका आहे, असे ओरडत होतात. तुमचे धाडस केवळ मुंबईपुरते आहे.
यापूर्वीही दौरा रद्द
चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई हे सर्वप्रथम 3 डिसेंबरला बेळगाव दौऱ्यावर जाणार होते. या दोन्ही मंत्र्यांना भेटीचे निमंत्रण महाराष्ट्र एकीकरण समितीने दिले होते. मात्र 3 डिसेंबरला कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हेदेखील बेळगावमध्ये होते. अशा वेळी महाराष्ट्राचे मंत्रीही तेथे आल्यास तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई आणि मुख्य सचिवांनी ही तारीख टाळण्याची विनंती केली होती. त्यामुळे चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांनी हा दौरा रद्द करत 6 डिसेंबरला बेळगावला जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, महापरिनिर्वाण दिनाचे कारण देत हा दौरा पुन्हा रद्द करण्यात आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.