आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबेळगावमध्ये महाराष्ट्राच्या 10 वाहनांची तोडफोड कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. यावर आमच्याही संयमाला मर्यादा आहे, असा इशारा सीमावाद प्रश्नी राज्य सरकारने नेमलेले समन्वयक व मंत्री शंभूराज देसाई यांनी दिला आहे.
धुडगूस थांबवावा
शंभूराज देसाई म्हणाले, महाराष्ट्राच्या 10 वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. एकीकडे सीमावादावर समन्वयातून तोडगा काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असताना अशी कृती होत असेल तर आमच्याही सहनशीलतेला मर्यादा आहेत. कर्नाटक सरकारने हल्लेखोरांविरोधात गुन्हा नोंदवून तातडीने त्यांच्यावर कारवाई करावी.
शंभूराज देसाई म्हणाले, कर्नाटक सरकारने तात्काळ हस्तक्षेप करून हा धुडगूस थांबवावा. कर्नाटकच्या गृहमंत्र्यांकडेही विनंती आहे की, त्यांनी हल्लेखोरांना तातडीने अटक करावी. कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी आज केलेल्या हल्ल्याचा मी तीव्र शब्दांत निषेध, धिक्कार करतो.
बोम्मईंच्या इशाऱ्याने फरक पडत नाही
दुसरीकडे, महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी बेळगावात येऊ नये. अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी आज दिला आहे. त्यावर शंभूराज देसाई म्हणाले, आम्ही निश्चित बेळगावला जाणार आहोत. तो आमचा अधिकार आहे. बोम्मई यांना काय कारवाई करायची आहे ती करू द्या. आम्ही घाबरणार नाहीत. बोम्मईंनी दिलेल्या इशाऱ्याचा आमच्या दौऱ्यावर काहीही परिणाम होणार नाही.
कर्नाटकला वाद पेटवायचाय
शंभूराज देसाई म्हणाले, आजच्या हल्ल्यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या मुद्द्यावर आतातायीपणा कोण करत आहे? वाद कोणाला पेटवायचा आहे?, हे आता समोर आल आहे. या वादाची प्रतिक्रिया इतर ठिकाणी उमठू नये, याची काळजी खरे तर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी घ्यायला हवी. मात्र, तेच वाद भडकावताना दिसत आहेत.
मोदी, शहांना माहिती देणार
शंभूराज देसाई म्हणाले, बेळगावमध्ये आज जो काही प्रकार झाला, त्याबाबत तातडीने उपमुख्यमंत्री फडणवीस व मुख्यमंत्री शिंदेंशी बोलणार आहोत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी या प्रकरणात मध्यस्थी करावी, अशी मागणी करणार आहोत. तसेच, आज घडलेल्या प्रकाराची माहिती पंतप्रधान मोदी यांनाही देणार आहोत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.